शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

अलका लांबा ‘आप’मध्ये


'एनएसयूआय'च्या माजी अध्यक्ष आणि राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या अलका लांबा यांनी काँग्रेसला अलविदा केला असून त्यांनी 'आम आदमी पक्षा'ला आपलेसे केले आहे.
काँग्रेस सोडताना त्यांनी उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केले असून गेल्या काही दिवसांपासून राहुल हे कार्यकर्त्यांपासून अधिकाधिक दूर चालले आहेत, असा आरोप लांबा यांनी केला.
'काँग्रेसप्रमाणेच भाजपच्याही अनेक कार्यकर्त्यांनी 'आप'मध्ये येण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कार्यकर्ते किंवा स्वयंसेवक म्हणून आम्ही त्यांचे स्वागतच करतो. आमच्या पक्षात प्रत्येकाचेच स्वागत आहे,' असे सांगून 'आप' नेते योगेंद्र यादव यांनी लांबा यांचे स्वागत केले. सामान्य कार्यकर्त्या म्हणून त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. लांबा यांनी दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन अर्थात, 'डुसू'चे अध्यक्षपद भूषविले आहे. लांबा यांच्यावर २००२ मध्ये अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. नंतर त्यांनी काँग्रेसचे चिटणीस म्हणूनही पद भूषविले होते. तसेच दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची धुराही सांभाळली होती. २००३ मध्ये त्यांना मदनलाल खुराणा यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. यंदाच्या वर्षीही लांबा यांना मोतीनगरमधून महापालिका तसेच विधानसभेसाठी उमेदवारी हवी होती. मात्र, पक्षाने त्यांना निवडणुकीचे तिकीट दिले नाही. त्यामुळे नाराज होऊन त्यांनी पक्ष सोडला असावा, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली.
'गेल्या वीस वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. पण आता काँग्रेस बदलली आहे. कार्यकर्ते सोडा, अनेकदा नेत्यांनाही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही.' अलका लांबा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...