शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

दंगलप्रकरणी मोदींना क्लीन चिट


गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या जातीय दंगलीप्रकरणी अहमदाबाद कोर्टाने मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आज क्लीन चिट दिली. कोर्टाच्या निर्णयाने मोदींना मोठा दिलासा मिळाला असून भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.


गुजरात दंगलीची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या एसआयटीने गेल्या वर्षी मोदी यांना क्लिन चिट देऊन क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. परंतु दंगलीत मारले गेलेले कॉंग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांची पत्नी जकिया जाफरी यांनी या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावर कोर्टाने आज निकाल देत मोदींना क्लिन चिट देण्याचा निर्णय कायम ठेवला.

दरम्यान, अहमदाबाद कोर्टाच्या आजच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपिल करणार असल्याचे जकिया जाफरी यांनी पत्रकारांना सांगितलं.

जकिया जाफरी यांच्या याचिकेवर निकाल देण्यासाठी कोर्टाने आधी २८ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली होती. त्यानंतर २ डिसेंबर रोजी तारीख निश्चित करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?

गुजरात दंगलीदरम्यान अहमदाबाद येथील गुलबर्ग सोसायटीवर हिंसक जमावाने हल्ला केला होता. या कॉलनीत राहणारे कॉंग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह एकूण ६३ जण मारले गेले होते. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर ६२ जणांनी या हिंसेला प्रोत्साहन दिलं होतं असा आरोप एहसान जाफरी यांची पत्नी जाकिया जाफरी यांनी कोर्टात केला होता.

या दंगलीवरील एसआयटीच्या अंतिम अहवालात, नरेंद्र मोदींविरोधात सबळ पुरावे नसल्याने त्यांना क्लीन चिट दिली होती आणि हे प्रकरण बंद करण्यात आलं होतं.

जाकिया जाफरी यांनी एसआयटीच्या या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत त्याला कोर्टात आव्हान दिलं होतं. या अहवालात मोदी कोणत्याही षडयंत्रात सहभागी नसल्याचं सांगत क्लीन चिट दिली होती.

जाफरी यांच्या तक्रारीनंतर एसआयटीने चौकशी करून ८ फेब्रुवारी २०१२ रोजी क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. आठ वर्ष झाल्याने पुरावे गोळा करण्यात अडचणी येत होत्या. याप्रकरणी अनेकांची साक्ष नोंदवण्यात आली होती. मात्र गुजरात दंगलीचे षडयंत्र रचल्याचा आरोप ज्यांच्यावर ठेवण्यात आला होता त्यात मोदींच्या नावाचा समावेश नव्हता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...