शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

उसाला अठराशेचा पहिला हप्ता


पश्चिम महाराष्ट्रात उसाला जादा भाव मिळावा यासाठी आंदोलने झाली. त्याचा फायदा त्या भागातील शेतकऱ्यांना होतो आहे. मराठवाड्यात मात्र सर्व साखर कारखानदार एकत्र आले आहेत. मराठवाड्यातील बहुतेक सर्व साखर कारखान्यांनी यावर्षीच्या गळीत हंगामात पहिला हप्ता
१८०० रुपये जाहीर केला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाचशे ते सातशे रुपये कमी भाव मिळत असल्याने या भागातील उसाला गोडी कमी आहे का असा सवाल व्यक्त होत आहे. गतवर्षी पेक्षा यंदा ऊस कमी असूनही शेतकऱ्यांना मात्र ऊसदराच्या बाबतीत शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.

राज्यात गेल्या काही वर्षात ऊस दरासाठी लढे झाले. पश्चिम महाराष्ट्रात याही वर्षी उसाला साडेतीन हजार भाव मिळावा यासाठी ऐन दिवाळीत आंदोलने झाले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात यंदाच्या गळीत हंगामात उसाला अडीच हजार ते साडे सव्वीसशे रुपये पहिला हप्ता देण्याची तयारी साखर कारखानदारांनी दाखवली. मराठवाड्यात मात्र गतवर्षी दुष्काळाची परिस्थिति होती. अशा दुष्काळात मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी ऊस जोपासला. मराठवाड्यातील २० च्या जवळपास साखर कारखान्यांचा गळीत हंगाम यंदा सुरू आहे. आतापर्यंत मराठवाड्यात २१ लाखाहून अधिक मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. वीस लाखांहून अधिक साखर पोती उत्पादन झाले आहे.

दुष्काळामुळे उसाचे काम कमी झाले असल्याने उसाला चांगला भाव मिळेल अशी आशा बळीराजाला होती. मात्र मराठवाड्यातील ऊसउत्पादकांच्या पदरी ऊसाच्या भावामुळे निराशा आली आहे. मराठवाड्यातील बहुतेक सर्व साखर कारखान्यांनी १८०० रुपये भाव देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे एरवी एकमेकविरोधात असणाऱ्या काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असणाऱ्या कारखानदारांचे या प्रश्नी एकमत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या परळीच्या वैद्यनाथ कारखाना, प्रकाश सोळूंके यांचा माजलगाव कारखाना, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी नेते राजेश टोपे यांच्या समर्थ कारखाना, उस्मानाबाद जिल्ह्यातील नॅचरल शुगर, आणि अरविंद गोरे यांचा आंबेडकर कारखाना, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर, या कारखान्यांनी या आठवड्यात एक हजार आठशे रुपयाने पेमेंट देण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात शेतकरी संघटनेचे मराठवाडा संघटक कालिदास आपटे म्हणाले की, लातूरला मराठवाड्यातील सर्व साखर कारखानदारांनी बैठक घेतली. या बैठकीत सगळ्या कारखानदार शेतकऱ्याला कमी पैसा द्यायची भूमिका घेतली. शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी सर्व कारखानदार पक्षभेद विसरून एकत्र आले आहेत असा आरोप आपटे यांनी केला.

मराठवाड्यातील साखर कारखानदारांचा १८०० रुपये पहिला हप्ता देण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची गरिबी वाढवण्याचा निर्णय आहे. शेतकऱ्यांना कमी भाव देणाऱ्यांना शेतकरी संघटना चोख उत्तर देईल. येत्या निवडणुकीत ऊस उत्पादक मराठवाड्यातील या सर्वपक्षीय कारखानदारांच्या युतीला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.

- रघुनाथदादा पाटील,

शेतकरी संघटनेचे नेते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...