शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३
बाजारपेठेवर तरुणाईचे राज्य
भारतीय चलनाची झालेली घसरण आदीचा परिणाम सरत्या वर्षाच्या सुरुवातीचे काही महिने व्यापार क्षेत्रावर होता; परंतु त्यांची कसर नंतर
झालेल्या चांगल्या पावसाने भरून काढली. विशेष म्हणजे मोबाईलसह अन्य गॅझेटसह फॅशनबेल कपड्यांना तरुणाईकडून मागणी वाढली. बाजारावर याच वर्गाचे अधिराज्य आहे. बाजाराने २०१२च्या तुलनेने या वर्षीच्या सर्वच फेस्टिवल सीझनमध्ये बाजारपेठेने कोटींची उड्डाणे घेतली आहे. आता पुढील पाच महिने लग्नसराई असल्याने आणि चांगल्या पावसामुळे नवीन वर्षातही बाजारपेठत चैतन्य कायम राहील, असा विश्वास व्यापारी वर्गाला आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता, या क्षेत्रात भविष्यात काळात चांगली ग्रोथ असून येऊ घातलेल्या डीएमआयसी प्रकल्पामुळे त्यात आणखी भर पडणार आहे. वाढत्या नागरीकरणामुळे व्यापारी क्षेत्रातही मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. अर्थात, त्याचवेळी अनेक आव्हाने व स्पर्धांना तोंड देण्याची वेळही येईल, असा सूर 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'राउंड टेबल' उपक्रमामध्ये सहभागी मान्यवरांनी व्यक्त केला.
सरत्या वर्षात व्यापार क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या विरोधात औषध विक्रेत्यांना वेळोवेळी आंदोलनांचे हत्यार उपसावे लागले, तर गुटखा आणि मावा बंदीमुळे पान टपरीचालक रस्त्यावर उतरले. वाढती स्पर्धा व मॉलला टक्कर देण्यासाठी व्यापाऱ्यांना विविध प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यावर भर दिला. चिल्लर वाटप करणे, कुशल कर्मचारी तयार करणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच वेळी गुंडागर्दी, सराफा व्यापाऱ्यांचा खून, जाधववाडी बाजार समितीतील समस्या आदी विविध कारणामुळे व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. येणाऱ्या आव्हानास तोंड देण्यासाठी सर्व व्यापारी संघटना अधिक सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे या क्षेत्राचा विस्तार होत असतानाच पायाभूत सुविधाचा अभाव, पार्किंगचा प्रश्न आणि कर प्रणालीतील गुंतागुंत अडसर ठरत आहे. व्यापारी क्षेत्राच्या विकासासाठी, व्यापाऱ्यांना स्थैर्य यावे, यासाठी देशांतर्गत व्यापारी धोरण शासनाने जाहीर करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...