सोमवार, १३ जानेवारी, २०१४

केजरीवालांच्या जिवाला धोका – IB


Click to orginal news

भ्रष्टाचारमुक्तीसाठी खणखणीत आवाज देऊन लाचखोरांशी थेट पंगा घेणारे दिल्लीचे तडफदार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जिवाला धोका असल्याचा इशारा गुप्तचर खात्यानं दिला आहे. आपल्या 'झाडू'नं 'मिशन साफसफाई'ला वेगानं सुरुवात केल्यानं माफिया त्यांच्यावर खवळलेत आणि त्यांच्या जिवावर उठलेत. त्यामुळे आता त्यांच्याभोवती कडेकोट सुरक्षाकवच उभारावं लागणार आहे.


अरविंद केजरीवाल यांचा जीव धोक्यात असल्याचं पत्र गुप्तचर खात्यानं दिल्लीचे नायब राज्यपाल आणि दिल्ली पोलिसांना पाठवल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं. त्यामुळे पोलीस अधिका-यांच्या वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. अरविंद केजरीवाल यांनी पोलीस संरक्षण घेण्यास नकार दिलेला असल्यानं पोलिसांपुढे पेच निर्माण झालाय. सध्या केजरीवालांना त्यांच्या नकळत सुरक्षा पुरवली जात असल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्या अवतीभवती पोलिसांचा गराडा दिसत नसला, तरी ठरावीक अंतरावर चोख बंदोबस्त असतो. त्यासाठी 'झेड' सुरक्षेपेक्षाही जास्त पोलीसबळाचा वापर होतोय. असं असताना, आता केजरीवालांच्या सुरक्षेसाठी आणखी पोलीसबळ तैनात करावं लागणार आहे आणि हे पोलिसांसाठी जिकीरीचं ठरणार आहे.

अरविंद केजरीवाल एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेत असल्यानं संघटित गुन्हेगारांचं धाबं दणाणलं आहे. आपलं अस्तित्व संपण्याची चिन्हं त्यांना दिसू लागली आहेत. या चिंतेतूनच ते केजरीवालांवर प्राणघातक हल्ला करू शकतात, असा इशारा आयबीनं दिला आहे. या पार्श्वभूमीवर, अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्र्यांना मिळणारी सुरक्षा घ्यायला हवी, त्यामुळे निर्भीडपणे निर्णय घेणं अधिक सोपं होऊ शकेल, असा सूर 'आप' समर्थकांमधून ऐकू येतोय. आता केजरीवाल हे ऐकणार का आणि पोलिसांवरच ताण कमी करणार का, हे पाहावं लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...