शनिवार, ११ जानेवारी, २०१४
गुगलला सक्षम पर्याय...'डक डक गो'
सर्च इंजिन असे म्हटले, की आपल्या डोक्यात पटकन नाव येते ते अर्थातच गुगलचे. मुख्यतः सर्च इंजिन असलेल्या या कंपनीने टप्प्याटप्प्याने ई-मेलपासून व्हिडिओ चॅटिंगपर्यंत आणि मॅप, फोटो शेअरिंगपासून क्लाउड डेटा स्टोरेजपर्यंत शेकडो प्रकारच्या सेवा उपलब्ध केल्या आहेत. अँड्रॉइड सिस्टीम आल्यानंतर तर ' गुगल ' च्या रूपानं जणू विश्वच अनेकांच्या अक्षरशः हातात आले आहे. अशा या गुगलचा प्रतिस्पर्धी तयार होतोय, असे म्हटले तरी पहिल्यांदा पटणारच नाही, अशी परिस्थिती आहे; पण ही गोष्ट खरी आहे आणि त्या प्रतिस्पर्धी सर्च इंजिनचे नाव आहे डक डक गो. https://duckduckgo.com/ही त्याची वेबसाइट.
वापरणाऱ्यांची ' प्रायव्हसी ' जपण्याच्या मुख्य उद्देशाने अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरच्या फिलाडेल्फियातल्या गॅब्रियल वेनबर्ग या ३३ वर्षांच्या इंजिनीअरने हे सर्च इंजिन २००८च्या अखेरीला सुरू केले. ' डक डक गूज 'नावाच्या लहान मुलांच्या एका खेळावरून ' डक डक गो ' हे नाव वेनबर्गला सुचले. सुरुवातीला त्याच्या नावावरून हेटाळणीही झाली. मात्र, नंतरच्या काळात त्याची टाइम मासिकासह अनेक दिग्गज माध्यमांनीही दखल घेतली आहे. हे सर्च इंजिन विकसित झाले, नेमक्या त्याच दरम्यान अमेरिकेच्या ' प्रिझम 'कार्यक्रमाबाबतची माहितीही उघड झाली होती. या कार्यक्रमाअंतर्गत अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहू यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या सर्व्हरवरच्या माहितीचा ' अॅक्सेस ' मागितला होता. गुगलसह सर्व सर्च इंजिन्स वापरणाऱ्यांची माहिती आपोआप त्यांच्या सर्व्हरवर सेव्ह केली जात असते. वापरणाऱ्याच्या डिव्हाइसचा (कम्प्युटर, टॅब, आयपॅड किंवा फोन) आयपी अॅड्रेस, त्यावरून सर्फ केल्या जाणाऱ्या साइट्स आदींची माहिती सर्च इंजिनच्या सर्व्हरला साठवली जाते. ती माहिती जाहिरातदारांना विकली जाते. त्या अनुषंगाने प्रत्येकाच्या डिव्हाइसवर सर्चेस दाखवले जातात, तसेच शेजारी येणाऱ्या छोट्या-छोट्या जाहिरातीही त्या वापरकर्त्याने जास्त वेळा सर्फ केलेल्या विषयाशी निगडित असतात. त्यामुळे एखाद्या गोष्टीसाठी केलेल्या गुगल सर्चचे रिझल्टदेखील प्रत्येक कम्प्युटरवर वेगवेगळे आणि त्या त्या कम्प्युटरवर केलेल्या अगोदरच्या सर्फिंगशी निगडित आणि मर्यादित असतात.
या बाबी लक्षात घेऊन वापरकर्त्याची प्रायव्हसी जपण्याच्या उद्देशाने हे सर्च इंजिन विकसित करण्यात आले आहे. हे सर्च इंजिन वापरणाऱ्या डिव्हाइसचा आयपी अॅड्रेस किंवा सर्फ केलेल्या साइट्स यापैकी कोणतीच माहिती सर्व्हरवर सेव्ह केली जात नाही. त्यामुळे ती दुसऱ्या कोणाला विकायचा किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी त्याचा उपयोग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच, प्रत्येक विषयाशी निगडित संपूर्ण माहितीच्या लिंक्स उपलब्ध होतात. विकिपीडिया, यू-ट्युब, बिंग किंवा अशा कोणत्याही विशिष्ट साइटवरचा सर्च करायचा असेल, तर आपल्या सर्चमध्ये त्याच्याशी संबंधित शॉर्टकट टाकला की झाले. आणखी अनेक प्रकारची सेटिंगही तिथे करता येतात. अजूनपर्यंत ' डक डक गो ' हे नाव कोणाला फारसं माहिती नाहीये; पण त्याचा वापर बऱ्यापैकी सुरू झालाय. त्यात दिवसाला केले जाणारे सर्चेस काही लाखांपर्यंत पोहोचले आहेत. एकंदरीत सुविधा पाहता हे सर्च इंजिन गुगलला चांगली टक्कर देऊ शकेल, असे वाटते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...