शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

माळेगाव पर्यटन क्षेत्र समावेश ?


नांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा ही पर्यटनाच्यादृष्टीने सुद्धा अत्यंत महत्वाची असून त्यासाठी प्रशासनाने पर्यटन विकासाचा पाच कोटी रूपयांचा आराखडा तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केली.

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेस ३१ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या यात्रेच्या पुर्वतयारीचा आढावा पालकमंत्री सावंत यांनी श्रीक्षेत्र माळेगाव येथे बुधवारी बैठकीत घेतला. जि. प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, आ. शंकर धोंडगे, आ. ओमप्रकाश पोकर्णा, उपाध्यक्ष प्रकाश राठोड, शिक्षण व बांधकाम सभापजी संजय पाटील कर्‍हाळे, समाजकल्याण सभापती मंगाराणी अंबुलगेकर, महिला बालकल्याण सभापती कौशल्याबाई कनशेट्टे, कंधार पंचायत समितीच्या सभापती पंकजा केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे, अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेच्या पर्यटन विकासाचा आराखडा मंजुरीसाठी राज्याच्या व केंद्राच्या पर्यटन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल. माळेगाव यात्रेचे महत्व अबाधित रहावे किंबहूना ते सतत वाढावे यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. या यात्रेसाठी येणार्‍या भाविक आणि यात्रेकरूंच्या सुविधेसाठी सर्व विभागांच्या अधिकार्‍यांनी प्राधान्याने कार्यवाही करावी. पोलिस विभागाने विशेषत: ही यात्रा शांतता व सुव्यवस्था कायम राखून पार पाडण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवावा. आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त पोलिस कर्मचारी उपलब्ध करून घेण्यात यावेत. यात्रेकरूंच्या मदतीसाठी पोलिस विभागाने सदैव सतर्क रहावे, असे ते म्हणाले.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून माळेगाव येथे ३५ लाख रूपये खर्च करून सभागृह बांधण्यात येणार असून त्याचे भूमिपूजनही लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सभागृहाचा लाभ यात्रेकरूंना होणार आहे. माळेगावातील पाणी पुरवठय़ाच्या व विकासाच्या योजनांसाठी यात्रेनंतर विशेष लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. मद्यविक्री बंदीचा निर्णय यात्रेमध्ये कडकपणे राबविला जाईल, यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ग्रामस्थ व यात्रेकरूंच्या सहकार्याने जिल्हा परिषदेने ही यात्रा दरवर्षी प्रमाणे चांगली होईल, यासाठी केंद्रीत करावे असेही सांगितले.
जि. प. अध्यक्ष बेटमोगरेकर यांनी यात्रेच्या पुर्वतयारीची सविस्तर माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविण्यपुर्ण योजना म्हणून यात्रा विकासासाठी २0 लाख रूपयांचा निधी दिल्याबद्दल पालकमंत्री सावंत यांचे अभिनंदन करून आणखी वाढीव निधी देण्याची मागणी केली.
आ. शंकर धोंडगे यांनी आपल्या भाषणात जिल्हा परिषदेचीच ही यात्रा नसल्याचे सांगितले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनाही सोबत घेवून काम केल्यास यात्रा यशस्वी होईल असे ते म्हणाले. आ. ओमप्रकाश पोकर्णा यांनीही माळेगाव यात्रेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची घोषणा केली. जि. प. उपाध्यक्ष राठोड यांनीही आपल्या खुमासदार शैलीत मनोगत व्यक्त केले.
सरपंच सारजाबाई धुळगुंडे यांनी गावातल्या विकासासाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी बालाजी वैजाळे, जि. प. सदस्य प्रा.. पुरूषोत्तम धोंडगे, दिलीप धोंडगे, डॉ. श्याम पाटील - तेलंग श्रीनिवास मोरे, कावेरी भालेराव, अँड. महेश कनकदंडे, संजय भोसीकर, आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
सुरेखा पुणेकर, रितेश देशमुखही येणार
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेसाठी जिल्हा परिषदेने राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, ग्रामविकास मंत्री जयंतराव पाटील, समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह खा. जयवंतराव आवळे, आ. अमित देशमुख, आ. दिलीपराव देशमुख, सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनाही निमंत्रण दिले आहे. त्यात लावणी महोत्सवासाठी सुरेखा पुणेकर यांच्यासह राज्यातील नामवंत कलाकारांना निमंत्रण देण्यासाठी जि.प.चे शिक्षणाधिकारी तथा सांस्कृतिक विभागप्रमुख बी.आर. कुंडगीर हे राज्याच्या दौर्‍यावर आहेत. तर शंकरपटाबाबत सर्वोच्च न्यायालयाने शिथीलता दिल्यामुळे यंदा शंकरपटाचे आयोजन करण्याबाबतही चर्चा सुरू आहे.
शाळांनाही ३ व ४ जानेवारी रोजी सुटी
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेसाठी जिल्हा परिषदेने शाळांना ३ आणि ४ जानेवारी रोजी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. माळेगाव यात्रा वाढावी यासाठी हा निर्णय घेतला असून खाजगी शाळांनाही या सुट्या लागू होणार आहेत. जिल्ह्यातील शाळांना इतर जिल्ह्यांच्या तुलनेत २ दिवस सुट्टया कमी मिळाल्याने या सुट्या देण्याची मागणी शिक्षक संघटनांच्यावतीने करण्यात येत होती. कलम ५२ नुसार या सुट्या दिल्याचे जि. प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी सांगितले. माळेगाव यात्रा वाढीसाठी या सुट्या उपयुक्त ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही माळेगाव यात्रेसाठी एक सुटी दिली जाते. ती सुटी आता २ जानेवारी रोजी देण्याची मागणी केली जात आहे. ३ व ४ जानेवारी रोजी जि. प. ची सुटी तर ५ जानेवारी हा रविवार असल्याने सलग चार दिवसांच्या सुट्या शाळांना मिळणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...