गुरुवार, २६ डिसेंबर, २०१३

श्रीक्षेत्र माळेगावच्या पर्यटन विकासाचा आराखडा पाच कोटीचा ?




नांदेड, दि. 26 :- दक्षिण भारतात सुप्रसिध्द असलेली नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा ही पर्यटनाच्यादृष्टिने सुध्दा अत्यंत महत्वाची असून त्यासाठी प्रशासनाने पर्यटन विकासाचा पाच कोटी रुपयांचा आराखडा तयार करावा, अशी सूचना  राज्याचे वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, विशेष सहाय्य व अपारंपारिक ऊर्जा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केली.
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेस 31 डिसेंबर रोजी सुरुवात होणार आहे. या यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्री सावंत यांनी श्रीक्षेत्र माळेगाव येथे बुधवारी आयोजित बैठकीत घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, आमदार शंकरअण्णा धोंडगे, आमदार ओमप्रकाश पोकर्णा, उपाध्यक्ष प्रकाश राठोड, शिक्षण व बांधकाम सभापती संजय कऱ्हाळे, समाज कल्याण सभापती मंगाराणी अंबुलगेकर, महिला बालकल्याण सभापती कौशल्याबाई कनशेट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे, अप्पर पोलीस अधिक्षक तानाजी चिखले यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेच्या पर्यटन विकासाचा आराखडा मंजूरीसाठी राज्याच्या व केंद्राच्या पर्यटन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे सांगून पालकमंत्री सावंत पुढे म्हणाले की, श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेचे महत्व अबाधित रहावे किंबहुना ते सतत वाढावे यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. या यात्रेसाठी येणाऱ्या भाविक आणि यात्रेकरुंच्या सुविधेसाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्राधान्याने कार्यवाही करावी. पोलीस विभागाने विशेषत: ही यात्रा शांतता व सुव्यवस्था कायम राखून पार पडण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा. आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त पोलीस कर्मचारी उपलब्ध करुन घेण्यात यावेत. यात्रेकरुंच्या मदतीसाठी पोलीस विभागाने सदैव सतर्क राहावे, असेही ते म्हणाले.
यात्रा आयोजनासाठी जिल्हा परिषदेने केलेल्या पूर्वतयारीबाबत समाधान व्यक्त करुन पालकमंत्री सावंत म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून माळेगाव येथे 35 लाख रुपये खर्चून सभागृह बांधण्यात आले असून याचा लाभ यात्रेकरुंना होणार आहे. माळेगावातील पाणी पुरवठयाच्या व विकासाच्या योजनांसाठी यात्रेनंतर विशेष लक्ष दिले जाईल. मद्यविक्री बंदीचा निर्णय यात्रेमध्ये कडकपणे राबविला जाईल यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज प्रतिपादन करुन सावंत यांनी ग्रामस्थ व यात्रेकरुंच्या सहकार्याने जिल्हा परिषदेने ही यात्रा दरवर्षी प्रमाणे चांगली होईल यासाठी लक्ष केंद्रीत करावे असेही सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...