गुरुवार, २६ डिसेंबर, २०१३

'जातिअंतासाठी बौद्ध संस्कृती प्रस्थापित व्हावी '

नांदेड - ब्राह्मणी आणि भांडवली व्यवस्थेला संपविण्यासाठी व जातिअंतासाठी बौद्ध संस्कृती प्रस्थापित करण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन विद्रोही कवी राहुल वानखेडे यांनी बुधवारी (ता. 25) व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि फुले-आंबेडकर विचारधारा समितीतर्फे आयोजित फुले-आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष वानखेडे बोलत होते. संमेलनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ चित्रकार भ. मा. परसावळे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत राजाभाऊ ढाले उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष भीमराव भुरे थडीसावळीकर, निमंत्रक सतीश कावडे, अशोक मल्हारे, कोंडदेव हाटकर, निमंत्रण समितीप्रमुख एन. डी. गवळे आदी उपस्थित होते.

श्री. वानखेडे म्हणाले, की भारताचे वास्तव भयंकरतेकडून भयावहकतेकडे वेगाने सरकताना दिसत आहे. अन्याय, अत्याचार, गरिबी, बेरोजगारी, जातीय आतंकवाद, नक्षलवाद, माओवाद, ब्राह्मणी आतंकवाद, धार्मिक व जातीय दंगली, भ्रष्टाचार, लूटमार, सर्वस्तरीय अनाचार व अनैतिकता यांनी परिसीमा गाठल्या आहेत. विषमतेची दरी एवढी रुंदावलेली आहे, की जगातील पन्नास टक्के गरीब एकट्या भारतात आहेत. त्याचबरोबर जगातील अब्जाधीशांच्या यादीतील पन्नास टक्के अब्जाधीश एकट्या भारतात आहेत. आपल्या देशाचे सार्वभौमत्व जागतिक बॅंक आणि जागतिक आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेकडे गहाण ठेवून त्यांच्या निर्देशानुसार त्यांच्या हातचे कळसूत्री बाहुले म्हणून जगावे लागत आहे. या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. बबन जोगदंड, जयप्रकाश गायकवाड, डॉ. सिद्धार्थ जोंधळे, प्रा. राजीव सूर्यवंशी, प्रा. संतोष देवराये, डॉ. शारदा कदम, भारत दाढेल, महेश होकर्णे, एल. ए. हिरे, एम. सायलू, जी. पी. मिसाळे, किशनराव ढवळे, डॉ. राम वनंजे, भाई प्रकाश वागरे, पी. के. खानापूरकर, डी. पी. झगडे, रमेश कसबे, डॉ. माधव बसवंते, अशोक ऊर्फ वामनदादा एडके, चंद्रकांत ठाणेकर आदींना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...