गुरुवार, २६ डिसेंबर, २०१३

मूलभूत सुविधांसाठी क्षेत्रीय कार्यालयावर "हल्लाबोल'

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयावर मंगळवारी (ता. 24) मोर्चा काढण्यात आला. संतप्त युवकांनी साठे चौकातही काही वेळ रास्ता रोको केला.
हडकोतील छत्रपती शिवाजी उद्यानाचे नूतनीकरण व सिडकोच्या प्रभाग क्रमांक चाळीसमधील विविध विकासकामांच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

सिडकोत नागरी सुविधांच्या नावाखाली महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना अवाजवी कराची आकारणी करून वेठीस धरले जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा निषेध करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका इंदूताई घोगरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. हडको, मुख्य बसस्थानकावरून मुख्य रस्त्याने निघालेल्या या मोर्चात महिला, युवक, शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. संजय घोगरे, गौतम पवार, विलास गजभारे, गजानन कत्ते, संतोष एकलारे, गजानन शिंदे, तानाजी पाटील, श्‍याम वडजे, श्री. घोगरे, दीपक खैरे आदींनी साठे चौकात घोषणाबाजी करून रास्ता रोको केला.

दरम्यान, पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना कार्यालयाच्या गेटवर अडवले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. त्यामुळे भावना लक्षात घेऊन सहायक आयुक्त गुलाम सादेक, पाणीपुरवठा विभागाचे श्री. देवणे आदींनी इंदूताई घोगरे यांच्याकडून निवेदन स्वीकारले. श्री. सादेक यांनी मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या सोडवण्याचे आश्‍वासन दिले. मोर्चात श्‍याम हंबर्डे, मनोज जयस्वाल, लखन घोगरे, संजू स्वामी, राहुल गजभारे, वत्सला पांचाळ, सोनाली स्वामी आदी महिला आंदोलनात सहभागी झाल्या.

...अन्यथा आक्रमक होऊ
महापालिका कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला सामोरे जाताना प्रशासनाने पुन्हा एकदा आश्‍वासन देऊन वेळ मारून नेली. नागरिकांकडून अवाजवी कर आकारणी करू नये, पाणीपुरवठा होत नसेल तर कर वसूल करू नये, अर्धवट घरकुलांची कामे पूर्ण करा; अन्यथा पुढचा मोर्चा आक्रमक असेल, असा दम आंदोलकांनी प्रशासनाला दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...