रविवार, २९ डिसेंबर, २०१३

'ब्राह्मण विद्यार्थ्यांना आरक्षण हवे'

राज्यातील ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आरक्षणाची सवलत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पेशवा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

संघटनेचे अध्यक्ष दीपक रणनवरे, अॅड. अपर्णा रामतीर्थकर, बाजारीव धर्माधिकारी, शैलेश कुलकर्णी, गोपाळ अहंकारी, मनोज जोशी, श्रीराम बडवे यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले. 'स्वातंत्र्यानंतर सामाजिक बदल होऊन ब्राह्मण समाज ग्रामीण भागातून विस्थापित होत गेला. धर्मव्यवस्थेच्या आधारावर भिक्षुकी व धर्मातील पूजापाठ कर्मकांड यासाठी पुरोहित म्हणून ग्रामीण भागातील ब्राह्मण समाज सामाजिकदृष्ट्या स्थिर होता.

कालांतराने समाजातील धर्म, रुढी, परंपरा कालबाह्य होत गेल्या व ब्राह्मण समाजाचे ग्रामीण भागात असलेले स्थान नाहीसे होत गेले. शहरीकरणातही या समाजाला अन्य समाजासारख्याच अडचणी आहेत,' असे स्पष्ट करत समाजाच्या अडचणी दूर करण्यासाठी संघटनेच्या वतीने अजितदादांकडे मागण्या मांडण्यात आल्या. त्यात ब्राह्मण समाजाच्या सुरक्षिततेसाठी विशेष कायदा करून सामाजिक विडंबनातून मुक्तता करण्यात यावी, ब्राह्मण समाजातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, ब्राह्मण समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक पातळीवर झालेल्या बदलांचा चांगला वाईट परिणाम शोधण्यासाठी अभ्यास गटांची शासनस्तरावर नेमणूक करावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...