शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

विद्यापीठांमध्ये 'मराठा' गणना - शिक्षण संचालनालय.




गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या मराठा समाजाला इतर मागासवर्गीय जातींमध्ये (ओबीसी) समावेश करण्यासंदर्भात राज्य सरकारने पाऊले उचलणे सुरू केले असून, त्याचाच भाग म्हणून राज्य सरकारने सर्व विद्यापीठातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांची गणना करण्याचे ठरवले आहे.

राज्य सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या संचालनालयातर्फे यासंदर्भात सर्व विद्यापीठांना फर्मान जारी करण्यात आले आहे. मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यासंदर्भात राज्य सरकारतर्फे धोरणात्मक निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली असून, यादृष्टीने राज्यातील विद्यापीठांमध्ये मराठा समाजाचे एकूण किती विद्यार्थी शिकत आहेत, ते कळवावे, असे विद्यापीठांना पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. सन २०१०-११, २०११-१२, २०१२-१३ या शैक्षणिक वर्षांपासूनची ही माहिती मागवण्यात आली असून, येत्या २८ डिसेंबरपर्यंत ती पाठविण्यात यावी, अशी सूचनाही या पत्रात करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार मुंबई विद्यापीठानेदेखील आपल्या सर्व प्राचार्य आणि विभागप्रमुखांना मराठा विद्यार्थ्यांसंदर्भात माहिती पुरविण्याची सूचना केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...