सोमवार, ६ जानेवारी, २०१४

माळेगाव यात्रेत 90 कोटींची उलाढाल

 माळेगाव यात्रेत आजवर जवळपास 80 ते 90 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. ही यात्रा अनेक वैशिष्ट्यांनी जशी नटली आहे, तशीच ती व्यापारी व ग्राहकांसाठी एक मोठी बाजारपेठ म्हणूनही प्रसिद्ध आहे.

दुष्काळाचे सावट दूर होऊन यावर्षी चांगला पाऊसकाळ झाल्याने यात्रेची भरभराट होईल व चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. यात्रेत एक रुपयाच्या सुईपासून 20 लाखांच्या घोड्यापर्यंत सर्वच वस्तू मिळत असतात. म्हणून येथे राज्यभरातून व्यापारी व ग्राहक आवर्जून हजेरी लावतात. या यात्रेत लोकरीच्या वस्तू, शेतीची अवजारे, खेळणी, कपडे, चादर, सतरंजी, गाधा, स्वेटर, ताडपत्री, मॅट, लाकडी वस्तू, कलाकुसरीच्या वस्तू, खाद्यपदार्थ, मिठाई, घोड्यांचा साज, बैलांचा साज, हळद-कुंकू, बत्तासे, टिपरे, सौंदर्य प्रसाधने, चष्मे, जुने कपडे, भांडी, दागिने, बांगड्या, कात्री, वस्तरे, मासे पकडण्याचे जाळे, घोंगडी, भाजीपाला, कुऱ्हाडी, लाह्या, फुटाणे या वस्तूंसह मनोरंजनासाठी तमाशा थिएटर, आकाश पाळणे, मौत का कुआ, सर्कस, सिनेमा थिएटर, पन्नालाल यासह अनेक बाबी येथे उपलब्ध होत असतात. या सर्वांच्या व्यवसायाचा फिरून अंदाज घेतला असता 90 कोटी रुपयांच्या आसपास व्यवसाय झाला असल्याचा अंदाज आहे. 

माळेगावचा महत्त्वाचा बाजार म्हणजे पशूबाजार होय. यात्रेत विक्रीला आलेल्या लालकंधारी, देवणी वळू, गाढव यांची नोंदच नसते. त्यातून होणारी आर्थिक उलाढाल ही वेगळीच असते. अजून यात्रा संपेपर्यंत शंभर कोटींच्या पुढे आर्थिक उलाढाल जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. 

500 घोड्यांची विक्री 
यात्रेच्या सहाव्या दिवसापर्यंत पाचशे घोड्यांची विक्री झाल्याची नोंद होती. त्यामध्ये तीन कोटींच्या आसपास उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. यात्रेत परस्पर दाखला बदलीतूनही पाचशे ते सहाशे घोडे विक्री झाली असावी, अशी माहिती सरपंचांनी दिली. अजूनही घोडा बाजार दहा दिवस चालतो त्यातूनही होणारी आर्थिक उलाढाल वेगळीच असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...