रविवार, ५ जानेवारी, २०१४

भारताने अंडर १९ आशिया कप जिंकला


भारताच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवत आशिया कप जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भारताने पाकिस्तानला ३१५ धावांचे विशाल लक्ष्य दिले होते मात्र पाकचा संघ २७४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. कर्णधार विजय झोल आणि संजू सॅमसन यांनी साकारलेल्या शतकी खेळींच्या जोरावर भारताने हा विजय साकारला.

भारताच्या युवा संघाने दुसऱ्यांदा या चषकावर आपले नाव कोरले आहे. यंदा महाराष्ट्राचा युवा खेळाडू विजय झोल याच्या नेतृत्वाखाली भारताचा १९ वर्षाखालील संघ आशिया चषकात उतरला होता. झोलने त्याच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत भारताला विजयपथावर नेले. अंतिम सामन्यातही त्याच्या खेळीमुळेच भारताचा विजय सोपा झाला.

भारताच्या ३१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात अडखळत झाली. त्यांचे पहिले चार फलंदाज ८८ धावांतच तंबूत परतले. त्यानंतर पाचव्या विकेटसाठी झालेल्या ९३ धावांच्या भागिदारीने भारताची चिंता वाढवली होती. मात्र, पाकने २०० चा टप्पा ओलांडल्यानंतर ठरावीक अंतराने पाकला धक्के बसत गेले. ५० षटकांत ९ बाद २७४ धावांपर्यंतच पाक मजल मारू शकला.

त्याआधी भारताच्या फलंदाजांनी सुरेख खेळी केली. विजय झोल आणि सॅमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी १८० धावांची भागिदारी करत भारताला ३०० पार नेले. भारत श्रीलंकेला हरवून तर पाक अफगाणिस्तानला हरवून अंतिमे फेरीत दाखल झाला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...