शनिवार, ४ जानेवारी, २०१४

मराठी मुस्लिम साहित्यिकांकडे दुर्लक्ष



सासवड येथे शुक्रवारपासून ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राज्यातील मुस्लिम मराठी साहित्यिकांना साधी निमंत्रणपत्रिकाही नाही अन् एकाही कार्यक्रमात सामावून घेतलेले नाही. या प्रकारावर नाराजी व्यक्त करीत मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाने तीव्र निषेध केला आहे. मुस्लिम मराठी साहित्य , सांस्कृतिक मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी अखिल भारतीय साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षांना निषेध व्यक्त करणारे पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की , ' महाराष्ट्र हे प्रगत आणि पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. अंदाजे ११. ते १२ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या राज्यात दहा ते बारा टक्के म्हणजे दीड ते दोन कोटी मुस्लिम राहतात. यातील ८० टक्केच्या वर मुस्लिमांची अभिव्यक्त होण्याची व्यवहाराची भाषाही मराठी आहे. मध्ययुगीन मुस्लिम मराठी संत कवींपासून आजतागायत महाराष्ट्रातले शेकडो मुस्लिम मराठीत लेखन करत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळाच्या आधीपासून मुस्लिम माणूस जोमाने साहित्य निर्मितीत गुंतला आहे. सय्यद आमीन , डॉ. यू. . पठाण , डॉ. अलीम वकील , डॉ. मोहमंद आजम यांच्याबरोबरच मराठी गजलेच्या प्रांतात इलाही जमादार , बदीउजमा खावर , . के. शेख , डॉ. शेख इक्बाल मिन्ने , जहीर शेख , फातिमा मुजावर , मुबारक शेख , अलीम मोमीन , मसूद पटेल , नजीब खान , राज पठाण असे मातब्बर गजलकार मराठी गजलेत अत्यंत मोलाची भर घालत आहेत.

प्रा. . . शहाजिंदे , प्रा. सय्यद अलाउद्दीन , जावेद पाशा कुरेशी , कलीम खान , इब्राहिम अफगान , प्रा. तस्लिमा पटेल , अजीम नवाज राही , रफिक सूरज , बादशहा सय्यद अशा कवींच्या काव्यसंग्रहांनी आपले इतिहास प्रस्थापित केले आहेत. महाराष्ट्राच्या विविध महाविद्यालयात मुस्लिम प्राध्यापक मराठीचे अध्यापन करत आहेत. कथा , कादंबरी , नाटक , साहित्याच्या अनेक प्रांतात मुस्लिम साहित्यिकांनी आपला ठसा उमटविला आहे.

तीन , चार , पाच जानेवारीला सासवड येथे होणाऱ्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची भरपूर कार्यक्रमांची रेलचेल असलेली पत्रिका आम्हाला पाहायला मिळाली आणि आश्चर्याचा धक्काच बसला. साहित्य संमेलनातील एकाही कार्यक्रमात महाराष्ट्रातील एकाही मुस्लिम मराठी साहित्यिकाला समाविष्ट करण्यात आलेले नाही. हे सखेद नोंदवावेसे वाटते.

एकाही मुस्लिम साहित्यिकाला निमंत्रित केले नसल्याने हे साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आहे का असा प्रश्न आपण स्वतःला आणि संयोजकांना विचारून पाहावा. त्यामुळे आम्ही सारे मुस्लिम मराठी साहित्यिक तीव्र शब्दात खेद आणि खंत व्यक्त करीत आहोत. सर्व साहित्य प्रवाहांना सामावून घेणारे साहित्य संमेलन नाही. याचीही आपण नोंद घ्यावी. मुस्लिमांनी मुख्य प्रवाहात यायला पाहिजे. असे सर्वच स्तरावर म्हटले जाते. परंतु स्वतःला मुख्य प्रवाह मानणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने समस्त मराठी मुस्लिम साहित्यिकांना या संमेलनापासून अलिप्त ठेवावे याला काय म्हणावे ? असा प्रश्न मिन्ने यांनी या पत्रातून उपस्थित केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...