रविवार, ५ जानेवारी, २०१४

इन्फोसिसचे बालकृष्णन ‘आप’मध्ये



देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे नातू आदर्श शास्त्री यांनी आम आदमी पार्टीत काम करण्यासाठी 'अॅपल'ची एक कोटी पगाराची नोकरी सोडल्याची घटना ताजी असतानाच, 'इन्फोसिस'च्या संचालक मंडळातून बाहेर पडलेल्या व्ही. बालकृष्णन यांनीही 'आप'मध्ये प्रवेश केला आहे.
देशातील या क्रांतिकारी चळवळीचा भाग होण्याची इच्छा असल्यानंच 'आप'चं सदस्यत्व स्वीकारत असल्याचं बालकृष्णन यांनी मोठ्या अभिमानानं सांगितलं आहे.

१९९१ पासून इन्फोसिसमध्ये कार्यरत असलेल्या व्ही. बालकृष्णन यांनी अलीकडेच २२ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्दीची सांगता केली होती. आता त्यांच्याकडे इन्फोसिसच्या सीईओपदाचे दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. पुढच्या वर्षी एस डी शिबुलाल निवृत्त झाल्यानंतर, त्यांची खुर्ची बालकृष्णन यांना मिळू शकते. टेक्नो जगतात बालकृष्णन यांच्या भावी वाटचालीबाबत ही चर्चा सुरू असली, तरी त्यांच्या डोक्यात मात्र वेगळीच चक्र फिरत आहेत. बालकृष्णन यांनी बुधवारी १० रुपये भरून आम आदमी पार्टीचं प्राथमिक सदस्यत्व घेतलंय आणि पक्षासाठी काम करायची त्यांची प्रामाणिक इच्छा आहे.

स्वच्छ प्रशासन, भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचं आश्वासन देणा-या आपचं वादळ दिल्लीपाठोपाठ आता देशभर घोंघावू लागलंय. वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर 'आप'चं भरभरून कौतुक करत आहेत, त्यांच्यावर विश्वास दाखवत आहेत. काही मंडळींनी तर नोकरी सोडून 'आप'साठी काम करायचीही तयारी सुरू केलेय. लाल बहादुर शास्त्रींचे नातू आदर्श शास्त्री यांनी हा पायंडा पाडला असून, आता बालकृष्णन यांच्यासारख्या बड्या असामीचा 'आप'प्रवेश राजकारणाला नवी दिशा देणारा ठरू शकतो.

अरविंद केजरीवाल किंवा आपच्या कुठल्याही नेत्याशी आपण चर्चा केलेली नाही. त्यामुळे पक्षात माझी काय भूमिका असेल किंवा मी निवडणूक रिंगणात उतरणार का, याबद्दल आत्ताच काही बोलणं घाईचं ठरेल, असं बालकृष्णन यांनी स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे, इन्फोसिसचे माजी संस्थापक नंदन नीलेकणी हे काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा लढाई लढण्याच्या तयारीत आहेत. आता त्यांच्या विरोधातच 'आप' बालकृष्णन यांना रिंगणात उतरवतं का, याबद्दल उद्योगविश्वात उत्सुकता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...