शनिवार, २८ डिसेंबर, २०१३

जिल्ह्यात 700 वाहनांद्वारे निरंकुश अवैध वाहतूक

नांदेड - परिवहन विभागाच्या सोयीस्कर चुप्पीने जिल्ह्यात अवैध वाहतूक कमालीची बोकाळली आहे. सुमारे 678 खासगी वाहने सर्व नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. यामुळे सुमारे
साडेआठ कोटी रुपयांचा फटका सहन करणाऱ्या एस.टी. महामंडळाने जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व संबंधितांकडे माहिती पुरवली. पण, त्याचा उपयोग मात्र शून्य आहे.

खासगी बसेसना टप्पा वाहतुकीची परवानगी नसतानाही कोंबड्या कोंबल्याप्रमाणे प्रवासी कोंबून सर्रास अशी वाहतूक सुरू आहे. अगदी दहा किलोमीटरवरचा थांबा घेत जिल्ह्यातील बहुतेक तालुक्‍यांसाठी या बसेस फेऱ्या करतात. नांदेड शहरातच या बसेसचा थांबा आहे. याशिवाय काळी-पिवळी जीपची संख्याही प्रचंड आहे. जास्तीत जास्त नऊ प्रवासी बसविण्याची क्षमता असलेल्या या जीपमधूनतून 15 पेक्षा अधिक प्रवासी धोका पत्करून प्रवास करतात. याशिवाय ऍपे ऑटो, मिनीडोअरद्वारे होणारी वाहतूक वेगळीच. सर्व महत्त्वाच्या मार्गावर ही खासगी प्रवासी वाहतूक सुरू असून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून ही वाहने भरधाव धावत असतानाही त्यांच्यावर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही. ठरवून दिलेल्या वेळा एस.टी. बसना पाळाव्या लागतात. त्यामुळे बसचे प्रवासी खासगी वाहने पळवतात. लांब पल्ल्याच्या खासगी बसही प्रसंगी टप्पा वाहतूक करतात. मोठ्या आणि मजबूत मार्गावर खासगी बस आणि काळीपिवळीने एस.टी.चा व्यवसाय पळविला आहे. कच्च्या रस्त्यावर आणि अंतर्गत भागातील गावात ऑटो पोचतात. परिणामी एस.टी. महामंडळाच्या बसेसना प्रवासी मिळणे कठीण होऊन बसले आहे. खासगी प्रवासी वाहतुकीत प्रचंड मोठी उलाढाल असून आर.टी.ओ.सह पोलिस प्रशासनही याबाबत मूग गिळून गप्प आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...