नांदेड -
देशाच्या राजधानीत सत्तेवर येणाऱ्या "आम आदमी पक्षा'ने येत्या वर्षात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच नांदेडातही हालचाली वेगवान केल्यात. नवीन वर्षाची सुरवातीपासून संपूर्ण आठवड्यात तालुकानिहाय संयोजक नेमण्यात येणार आहेत.
मागील पंधरवड्यापासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणि प्रसिद्धी माध्यमांपासून तो समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत केवळ "आम आदमी' आणि अरविंद केजरीवाल यांच्याच भोवती चर्चा फिरते आहे. भ्रष्टाचार, महागाई आणि दप्तर दिरंगाई, या दुष्टचक्रात सर्वसामान्य माणूस भरडला जात असून नांदेडकरही त्याला अपवाद नाहीत. जिल्ह्यात कॉंग्रेस आणि अशोक चव्हाण यांचा एकछत्री अंमल आहे. पण, "आदर्श'च्या भोवऱ्यात अशोकराव पुरते वेढले गेल्याचे चित्र मंत्रिमंडळाने अहवाल फेटाळल्यानंतर अधिक ठळकपणे समोर आले आहे. "मोदी फॅक्टर'मुळे भाजपला सत्तासोपानाची गुलाबी स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी नांदेडात भाजपमधील इच्छुकांत रस्सीखेच सुरू झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर "आम आदमी'ने हालचाली गतिमान केल्या आहेत. अद्याप कोणते वलयांकित व्यक्तिमत्त्व नांदेड जिल्ह्यात या पक्षात सामील झाले नसले तरी संयोजक पदांच्या नियुक्त्यांच्या निमित्ताने कशी वातावरण निर्मिती होते, याला महत्त्व आहे. दरम्यान "आप'च्या पाच रोजी कंधार, लोहा, नांदेड, सहाला माहूर, किनवट, ता. सात जानेवारीला हिमायतनगर आणि हदगाव येथे शासकीय विश्रामगृहात बैठका घेण्यात येणार आहेत. देशप्रेमी नागरिक आणि नवयुवकांनी या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन नरेंद्रसिंघ ग्रंथी, ऍड. मोहनदास जहागीरदार, मनोहनराव सिरसाट आणि महिला प्रतिनिधी सरोज पेठे यांनी केले आहे.
अशोकरावांच्या मतदारसंघापासून श्रीगणेशा
नवीन वर्षाच्या सुरवातीचा महूर्त "आम आदमी'ने निवडला असून अशोकरावांच्या मतदारसंघातच "श्री गणेशा' करण्यात येतो आहे. एक जानेवारीला अर्धापूर, भोकर आणि मुदखेड येथील शासकीय विश्रामगृहात अनुक्रमे सकाळी 11, दोन आणि पाच वाजता, दोन तारखेला उमरी, धर्माबाद, बिलोली, चारला देगलूर, मुखेड आणि नायगावात बैठका होणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...