जिजाऊ जन्मोत्सव साजरा..
राजधानी दिल्लीत जिजाऊ जन्मोत्सव साजरा..
राजधानी दिल्लीत महारष्ट्र भवनात १२ जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या
उत्साहात साजरा करण्यात आला..ह्या वेळी राजकीय मंडळी,सरकारी अधिकारी तसेच
सचिवांची उपस्थिती होती... मराठा सेवा संघ दिल्लीच्या वतीनेही जिजाऊ
जन्मोत्साव्चे आयोजन कमलेश पाटील ह्यांनी केले होते...
हरयाणा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा..
हरयाणा राज्यातील पानिपत येथे मोठ्या संख्येने मराठी लोक राहतात,काल आम
मैदानात १२ जानेवारी रोजी मराठा जागृतीमंच च्यावतीने जिजाऊ जन्मोत्सवाचे
आयोजन करण्यात आले होते.. ह्या वेळी हजारो रोड मराठ्यांनी गर्दी केली
होती..जय जिजाऊ..जय शिवराय च्या घोषात हा कार्यक्रम संपन्न झाला..ह्या वेळी
मराठा वीरेंद्र वर्मा ह्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.. तसेच
१४ जानेवारीला पानिपत येथील काला आम येथे मराठा शौर्य दिनाचे आयोजन
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .ह्या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे
अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर आणि मुख्यमंत्री हुड्डा ह्यांची प्रमुख
उपस्थिती होती...ह्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून संभाजी ब्रिगेड तसेच
शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते .
पुण्यात हजारोंच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा
ह्या वर्षी पुण्यातही लाल महाल आणि शनिवारवाडा येथे जिजाऊ जन्मोत्सवाचे
भव्य प्रमाणात आयोजन करण्यात आले होते..शिवप्रेमी जनजागरण समिती आणि
लोकशासन आंदोलन च्या वतीने ह्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते..
सिंदखेड पाठोपाठ सर्वाधिक गर्दी ह्या कार्यक्रमाला होती..महानगरपालिका भवन
येथून भव्य मिरवणूक निघून लाल महाल येथे जीजौंचे दर्शन घेतल्यावर
शनिवारवाडा येथे भव्य सभा झाली..ह्या कार्यक्रमामुळे शिवाजी महाराज रोड
गर्दीने फुलून गेला होता..ह्या कार्यक्रमाला माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे
पाटील,पी.बी.सावंत,बाबा आढाव,प्रतिमा परदेशी ह्यांची प्रमुख उपस्थिती
होती..
शिवधर्मपीठावर राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा
सिंदखेडराजा, १३ जानेवारी
छत्रपती शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या ४१२ व्या
जन्मोत्सवाची सांगता काल सिंदखेडराजा-जालना मार्गावरील शिवधर्मपीठाच्या
पटांगणावरील मातृतीर्थ जिजाऊ सृष्टी परिसरात देश-विदेशातून आलेल्या सुमारे
२० हजारांच्या जनसागराच्या उपस्थितीत करण्यात आली. देशाच्या कानाकोपऱ्यातून
शिवभक्त यासाठी आलेले होते. तत्पूर्वी, सकाळच्या सुमारास राजवाडय़ात
राजमाता जिजाऊंचे पूजन करण्यात आले. सुमारे चार एकराच्या परिसरात हा
जन्मोत्सव सोहोळा ३ जानेवारीपासून सुरू झालेला होता. काल सकाळी जिजाऊ
पूजनानंतर शिवविवाह सोहोळ्यासह अन्य कार्यक्रम साजरे झाले.
काल
दुपारी ३ वाजता झालेल्या सांगता समारंभाला मराठा सेवा संघाचे संस्थापक
अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, नेताजी गोरे, संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष
प्रवीण गायकवाड, माजी आमदार रेखा खेडेकर, देवानंद कापसे, विजया कोकाटे,
ऑस्ट्रेलियाहून आलेले प्रशांत राळे आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना
पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, असे नामकरण
करण्यासाठी राज्यात युतीचे सरकार असताना बाळासाहेब ठाकरे यांनीच विरोध केला
होता. युती सरकार सत्तेत असताना औरंगाबाद महानगरपालिकेने औरंगाबादचे
संभाजीनगर, असे नामकरण करण्याचा ठराव मांडला होता. तसाच ठराव तत्कालीन युती
सरकारनेही मंजूर केला होता, परंतु तत्कालीन कायदामंत्री अॅड. लिलाधर डाके
यांना राज्य सरकारची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासाठी एका वकिलाची
नेमणूक करायची होती. ते टाळण्याचा सल्ला बाळासाहेब ठाकरे यांनी लिलाधर डाके
यांना दिला होता. त्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्र शासनाची भूमिका
सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासाठी वकील नव्हता. सलग तीन तारखांना शासनाची
भूमिका सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली गेली नाही. त्यामुळे तत्कालीन राज्य
सरकारला औरंगाबादचे संभाजीनगर, असे नामकरण करण्यास स्वारस्य नाही, असे
सर्वोच्च न्यायालयाला वाटले, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद हेच नाव
कायम ठेवले.
शिवसेनेने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे
मुस्लिमांचे विरोधक आहेत, असा प्रचार केला. मात्र, मराठा महासंघाची
मुस्लिमांसोबतची भूमिका सामंजस्याची आहे. शिवसेनेने जर त्यांची भूमिका
सोडली तर संभीजानगर, असे नामकरण करण्यास मराठा महासंघाचा आक्षेप राहणार
नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रारंभी
संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली
संभाजी बिग्रेडच्या दिडशे कार्यकर्त्यांनी परेड केली. त्यानंतर शिवधर्माचे
ध्वजारोहण प्रवीण गायकवाड, माजी आमदार रेखा खेडेकर, देवानंद कापसे, विजया
कोकाटे, ऑस्ट्रेलियाहून आलेले प्रशांत राळे यांनी ध्वजारोहण तसेच, जिजाऊ
ध्यानमंदिराचे भूमिपूजनही केले. त्यानंतर सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज
यांच्या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम झाला.
ध्वजारोहणानंतर प्रवीण
गायकवाड म्हणाले, पुण्यातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला, त्यामुळे एक
इतिहास निर्माण झाला आहे. आज मराठा सेवासंघ एक वीस वर्षांंचा तर, संभाजी
ब्रिगेड चौदा वर्षांची झाली आहे. दोघेही तरुण आहेत आणि इतिहास तारुण्यातच
निर्माण होत असतात. पुतळा काढल्यानंतर पुण्यात भाजप-सेना रस्त्यावर उतरली.
त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या प्रेमापोटी पुणे महानगरपालिकेचे शिवाजी
सभागृह फोडले. शिवसेना स्वत: कुठलाच कार्यक्रम ठरवत नाही. त्यांना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशावरच चालावे लागते, असे या प्रकरणावरून
दिसून येते. शिवसैनिकांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य जरूर वाचावे, असा
सल्लाही त्यांनी दिला. तसेच, ठाणे जिल्ह्य़ातील दादोजी कोंडदेव स्टेडियमचे
व सांगलीच्या एका बँके तील शिवरायांसोबत दादोजी कोंडदेव असलेले छायाचित्र
हटवण्यासाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील संभाजी ब्रिग्रेडच्या
कार्यकर्त्यांनी रान उठवावे. यासोबतच बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिव
छत्रपती व लालमहल या पुस्तकावर राज्य सरकारने बंदी घालावी. रायगडावर
शिवरायांच्या समाधीजवळ तेवढय़ाच उंचीची वाघ्या कुत्र्याची समाधी लोकमान्य
टिळकांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाली. ती पाडण्यासाठी पुढाकार घ्यावा,
असेही आवाहन त्यांनी केले.
यावेळी पंढरपूर येथील बद्रीनाथ महाराजांना
पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते मराठा भिष्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात
आले. मानपत्राचे वाचन डॉ. स्मिता देशमुख यांनी केले. यावेळी पप्पू भोयर,
डॉ. दिलीप देशमुख, श्रीमंत कोकाटे, ब्रिग्रेडिअर सुधीर सावंत, जिजाऊ
ब्रिगेडच्या सीमा ढवळे, नेताजी गोरे, ओरिसातून आलेले बंसीधर नायक, तसेच
पंढरपुरे तनपुरे महाराज यांची भाषणे झाली. या जिजाऊ जन्मोत्सव सोहोळ्याचे
संचालन डॉ. सीमा देशमुख तर, प्रास्ताविक देवानंद कापटे यांनी केले.
राजवाडय़ात जिजाऊ जन्मोत्सव साजरा
सिंदखेडराजा, १२ जानेवारी
छत्रपती शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा ४१२ वा जन्मोत्सव
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजवाडय़ात बुलढाणा जिल्हा परिषद, सिंदखेडराजा
पंचायत समिती व सिंदखेडराजा नगर परिषदेच्यावतीने पूजन करून संपन्न झाला.
यावेळी सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, बुलढाणा
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रा. नरेंद्र खेडेकर, उपाध्यक्ष राम जाधव, पंचायत
समिती सभापती शीला शिंगणे, नगर परिषद नगराध्यक्ष बबन म्हस्के, उपाध्यक्ष
जगन ठाकरे, जिल्हा परिषद सभापती वैशाली सुपेकर, अभय चव्हाण, प्रभारी मुख्य
कार्यपालनाधिकारी संजय कापडणीस यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी हजर होते.
यानंतर शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी
काढली. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष नरेंद्र खेडेकर यांच्या
अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण झाले. या कार्यक्रमाचे
उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम जाधव यांनी केले.
जिजाऊ
जन्मोत्सवाचे औचित्य साधून याहीवर्षी मराठा सेवासंघ द्वारा आयोजित शिवविवाह
जिजाऊ सृष्टीवर शिवधर्म पद्धतीने संपन्न झाला. यावेळी मराठा सेवा संघाचे
संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, प्रदेश सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष
डॉ. दिलीप देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी
सिंदखेडराजा येथील गजानन प्रल्हाद सवने व संगीता रामकिसन मोहिते, (मांडवा
(लोणार) येथील पंढरी रामकिसन मुढ्ढे व गिर्झापूर (वाशीम) येथील नंदा विठ्ठल
घायाळ, टाकरखेड वायाळ येथील आनंद प्रल्हाद पवार व तढेगावच्या करुणा नामदेव
गवई, वणी येथील दत्ता डोहे व वणीच्या सीमा अस्वले तसेच पुण्याचे संतोष
शिंदे व तेर (जि. उस्मानाबाद) येथील शालिनी मासाळे यांचा विवाह या
सोहोळ्यात पार पडला.
आज जिजाऊ जन्मोत्सव, सिंदखेडराजा सज्ज!
सिंदखेडराजा, ११ जानेवारी/ वार्ताहर
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव मराठा सेवा
संघाच्यावतीने जिजाऊ दशरात्रौत्सव साजरा होत आहे. ३ जानेवारीपासून या
सोहोळ्याला सुरुवात झाली असून उद्या १२ जानेवारीला सांगता होणार आहे.
महाराष्ट्रासह देश-विदेशातील पाहुणे मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत पोहोचत
आहेत. विविध वैचारिक तसेच, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सिंदखेडराजा-जालना
मार्गावरील जिजाऊसृष्टी परिसर सज्ज झाला आहे. सुमारे १०० एकराच्या परिसरात
भव्य सभामंडप उभारून त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच, राजवाडा
परिसरात रंगरंगोटी करण्यात आली आहे. रस्त्यावर स्वागत कमानी उभारून
येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले जात आहे. शिवभक्तांना वैचारिक खाद्य
पुरवण्यासाठी पुस्तकांची दुकाने, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच
उपाहार गृहाची दुकाने घातली आहे. येणाऱ्या पाहुण्यांची अडचण लक्षात घेऊन
त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चौकशी कक्ष, देणगीदारांसाठी देणगी कक्ष
उभारण्यात आले आहेत. यामुळे या परिसराला भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले
आहे. जिजाऊ जन्मस्थळ, राजे लखोजीराव जाधवांचे समाधीस्थळ, रंगमहाल यासह
जिजाऊसृष्टीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे या
सोहोळ्यावर पॅराग्लायडिंगद्वारे पुष्पवृत्ती केली जाणार आहे.
उद्या १२
जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता राजवाडय़ावरील जिजाऊ जन्मस्थळावर मातोश्री
जिजाऊंचे पूजन मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार रेखा
खेडेकर, नेताजी गोरे, तहसीलदार सुनील शेळके, काँग्रेस नेत्या जयश्री शेळके,
विचारवंत डॉ. आ.ह. साळुंके, देवानंद कापसे, राजे शिवाजीराव जाधव, अरविंद
गावंडे, पंढरपूरचे बद्रीनाथ महाराज, चनखोरे, कैकाडी महाराज, ‘शंभुराजे’
नाटक फेम सातारा येथील हर्षवर्धन कदम, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या निमित्ताने या ठिकाणी दिवसभर सांस्कृतिक, वैचारिक कार्यक्रमाची रेलचेल
राहणार आहे. तसेच, मुख्य कार्यक्रमात मराठा विश्व भूषण, जिजाऊ पुरस्काराचे
वितरण तसेच, दुपारी २ वाजता शिवधर्मपीठावर नामावंत व्यक्तींचा सत्कार,
पुस्तकांचे प्रकाशन व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी जास्तीत जास्त
संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
उस्मानाबाद,दि.१- जिजाऊ जन्मोत्सव समितीच्यावतीने देण्यात येणारा ‘जिजाऊ
पुरस्कार’ सौ. विमल बलभीम मोरे यांना जाहीर झाला आहे. जिजाऊ जयंतीदिनी
बुधवारी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रात
उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे.
जिजाऊ जयंतीनिमित्त समितीच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले
आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या
व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुयश संपादन
केलेल्या महिला, राज्यपातळीवर अजिंक्य ठरलेला श्रीपतराव भोसले हायस्कूलचा
महिला संघ, छत्रपती हायस्कूलच्या मुलींचा व्हॉलीबॉल संघ, तसेच उस्मानाबाद
आकाशवाणीचे निवेदक संजय मैंदर्गी व आनंद वीर, खो-खो असोसिएशनचे राज्य
सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव आदींचा सत्कार या कार्यक्रमात होईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,
प्रमुख अतिथी म्हणून आमदार राणाजगजीतसिंह पाटील, राज्य सहकारी बँकेचे
संचालक विश्वास शिंदे, सत्तार शेख, के. टी. पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष
मिलिंद पाटील, शिवसेनेचे अनिल खोचरे, रिपाइंचे राजाभाऊ ओहाळ, मनसेचे अनिल
मंजुळे हे उपस्थित राहणार आहेत.
बुधवारी सकाळी ९.३० वाजता शहरातील
जिजाऊ चौक, बार्शी नाका येथे आयोजित या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित
रहावे, असे आवाहन जिजाऊ जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मधुकर अनभुले, डॉ. सुभाष
वाघ, श्याम कदम, राहुल सूर्यवंशी आदींनी केले आहे.
जवान संघटनेच्या वतीने राजगडाच्या पायथ्याशी जिजाऊ जन्मोत्सव साजरा. —
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...