रविवार, २९ डिसेंबर, २०१३

‘आदर्श’ : राज्यात सत्ता सोडा

' आदर्श' चा चौकशी अहवाल फेटाळून मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराला पाठीशी घातले आहे.
त्यामुळे केवळ मुख्यमंत्र्यांनी राजीमाना द्यावा अशी मागणी करण्यापेक्षा सरकारनेच राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली.

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर काही मिनीटे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांची प्रतिमा क्लीन असेल पण 'आदर्श' चा चौकशी अहवाल फेटाळून त्यांनी भ्रष्टाचाराला पाठीशी घातले आहे. हा अहवाल फेटाळायचाच होता तर चौकशी समिती कशासाठी नेमली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. चौकशी समितीसाठी शासनाने सात कोटी रुपये खर्च केले. अहवाल फेटाळल्यामुळे हा खर्च वाया गेला आहे. चौकशी अहवाल फेटाळून भ्रष्टाचाराला पाठिशी घातले जात आहे त्यामुळे आता सरकारनेच बाजूला व्हावे.

दिल्लीतील 'आप' सरकारच्या शपथविधी बद्दल प्रतिक्रीया व्यक्त करताना ठाकरे म्हणाले, फक्त दिल्लीतच नाही तर सर्वत्रच जनता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमुळे त्रस्त झाली आहे. त्यामुळे राज्यात महायुतीच सत्तेवर येणार आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय झाले असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले, बैठकीत काय झाले ते सांगायचे नसते. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरले का असे त्यांना विचारले असता उमेदवार ठरले आहेत, निवडणुकीपूर्वी ते जाहीर करू असे त्यांनी स्पष्ट केले. मराठवाड्यातील चारही जागा शिवसेना जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...