नांदेड कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत असून यासाठी इच्छूक शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन आज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.जी.एस.पडवळ यांनी केले आहे.
विविध देशानी विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान, त्याचा केलेला अवलंब, त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय तसेच संबंधित संस्थाना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरीता राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यासाठी शासन निर्णयानुसार अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्याची योजना मंजुर करण्यात आली आहे. युरोप, द. अफ्रिका, द. अशिया, द. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्युझिलँड, सिंगापूर इत्यादी देशांमध्ये अभ्यास दौऱ्याचे नियोजन आहे.
यासाठी 1 लाख 30 हजार ते 2 लाख 5 हजार खर्च अपेक्षित असून राज्यशासनाकडून खर्चाचे 50 टक्के किंवा रु. 1 लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील.
दौऱ्यासाठी शेतकरी निवडीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. शेतकऱ्याचे स्वत:चे नावे वैध पारपत्र जे दौरे निघण्यापूर्वी 6 महिने मुदत असलेला असावा. शेतकऱ्यांचे स्व:ताचे नावे शेत जमिन नोंद असलेला सातबारा, आठ अ असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन प्रामुख्याने शेती असावे. शेतकऱ्याचे वय 21 ते 62 वर्षाच्या दरम्यान असावे. शेतकरी शासकीय, निमशासकीय संस्थेत नौकरीस नसावा. शेतकरी यापूर्वी केंद्र, राज्य शासनाच्या विभागामार्फत अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. परदेश दौऱ्यास जाण्यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या संसर्ग जन्य रोगाची लागण झालेले नसावे. शासकीय आरोग्य अधिकारी यांचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे व राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.जी.एस.पडवळ यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...