रविवार, २९ डिसेंबर, २०१३

शिवसेनेतील लोकशाही आता बंद

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत येथील 'हॉटेल रामा इंटरनॅशनल'मध्ये औरंगाबाद व परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई, उपनेते खासदार चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर कला ओझा उपस्थित होते.

सुमारे अर्धा-पाऊण तास उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, 'मी काही शिवसेनाप्रमुखांएवढा मोठा नाही, तेवढा मोठा होणारही नाही. शिवसेना हा पक्ष मी शिवसैनिकांच्या शिस्तीत वाढवला आहे. माझे शिवसैनिक कडवे शिस्तीचे आहेत, त्यामुळे शिवसेनेत लोकशाही आणू नको, असे ते मला सांगायचे. आता मला ते पटले आहे. त्यामुळे आता मी शिवसेनेतील लोकशाही बंद करीत आहे.' शिवसेनेतील लोकशाही बंद करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या गर्जनेनंतर बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या या गर्जनेचे टाळ्या वाजवून व घोषणा देऊन स्वागत केले. पदाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या या प्रतिसादाचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले,' पक्षातील लोकशाही बंद करणार असे म्हटल्यावर तुम्ही जो प्रतिसाद दिलात त्यावरून तुमचा माझ्यावर विश्वास आहे हे स्पष्ट झाले आहे. तुमच्या या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही.'

शिवसेनाप्रमुखांमध्ये कमालाची आत्मविश्वास होता. त्याच्या बळावरच त्यांनी १९८८ मध्ये औरंगाबादची महापालिका जिंकली. १९९५ मध्ये त्यांनी राज्यातील काँग्रेस आघाडीची सत्ता उलटून टाकली, असा उल्लेख करून ठाकरे म्हणाले, 'कोणतीही निवडणूक लढवताना आत्मविश्वास महत्वाचा आहे. बुद्धीबळाच्या खेळासारख्या निवडणूका लढवू नका. राज्यातील काँग्रेस आघाडीचे सरकार पाडायचे म्हणजे पाडायचे असा आत्मविश्वास ठेवून कामाला लागा. हा काळ कसोटीचा आहे. आता धुळवड सुरू होईल. धुळवड सुरू झाली तरी रंगपंचमीचा रंग भगवाच असला पाहिजे.'

राज्यात शिवसेनेच्या वाट्याला २२ जागा आल्या आहेत. त्यापैकी वीस जागा आपण कधी न कधी जिकलेल्याच आहेत. आता जोर लावला तर सर्वच्या सर्व २२ जागा आपण जिंकू, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. पदाधिकाऱ्यांना आवाहन करताना ठाकरे म्हणाले, मोदी आहेत, शिवसेनेला वातावरण चांगले आहे म्हणून बिनधास्त राहून चालणार नाही. जेव्हा वातावरण अनुकूल असते तेव्हा जबाबदारी अधिक वाढते. आपापसात राजकारण करणार असाल तर दुसऱ्यांची धुणी किती दिवस धुवायची याचाही विचार करा असा संदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना ज्या टप्यापर्यंत नेली आहे, त्या टप्याच्या एक पाऊल पुढे मला शिवसेना न्यायची आहे असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सर्व्हे आनंद देणाराच असतो

लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सध्या जे सर्व्हे येत आहेत ते शिवसेनेच्या बाजूचे आहेत असा उल्लेख खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणात केला. हाच धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले, 'सर्व्हे आनंद देणारेच असतात. जर ते आपल्या बाजूने असतील तर त्याचा अधिक आनंद होतो. पण सर्व्हेवर विसंबून राहू नका. लोकं घरातून उठून मतदान करणार नाहीत, त्यासाठी तुम्हालाच काम करावे लागणार आहे.त्यासाठी चांगली टीम तयार करा. खैरे आहेतच, त्यांच्या सोबत सर्वांनी टीम म्हणून काम करावे. उमेदवार कोण ते स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता फक्त जिंकायचेच.'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...