शनिवार, २८ डिसेंबर, २०१३
समाज कल्याणच्या सायकलचे चाक पंक्चर
नांदेड - जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्याचा निर्णय एका बैठकीत घेतला. परंतु शाळेचे द्वितीय सत्र सुरू होऊन बराच कालावधी लोटला तरीही सायकलचे वाटप झाले नाही.
समाज कल्याण समितीची बैठक जुलै महिन्यात घेण्यात आली होती. यामध्ये ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल तर महिलांना लघू व्यवसायासाठी शिलाई मशीन वाटप करण्याचा ठराव घेण्यात आला. यासाठी शेषमधून वीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. सायकल व शिलाई मशीन वाटपाला स्थायी समितीच्या बैठकीत ही मंजुरीही मिळाली. मात्र, तेव्हापासून सायकल तर सोडाच; शिलाई मशीनही लाभार्थ्यांना वाटप झाली नाही. शिलाई मशीनसाठी अनेक महिला आशा लावून बसल्या आहेत. नियोजनाचा अभाव अन् पाठपुरावा करण्यात अधिकारी तथा समितीचे पदाधिकारी कमी पडल्याने गत सहा महिन्यांपासून सायकल व शिलाई मशीनवर तोडगा निघू शकला नाही. परिणामी आर्थिक वर्ष संपायला तीन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे, अन् त्यातली-त्यात अचानक लोकसभा निवडणुकीचा आदर्श आचारसंहिता लागू झाल्यास लाभार्थ्यांना पुढचे चार-पाच महिने फरपटावे लागणार आहे. समाज कल्याण सभापती मंगाराणी अंबुलगेकर म्हणाल्या, की सायकल अन् शिलाई मशीनच्या वाटपासंदर्भात नियोजन झाले आहे. मात्र जिल्हा परिषद शेषमधून अद्याप निधी आला नसल्यामुळे वाटपास विलंब होत आहे. निधी आल्यावर लवकरच निपटारा केला जाणार आहे.
कामात मागे
इतर विभागाने लाभाच्या योजनांचे लाभार्थ्यांना वाटप केले. मात्र समाज कल्याण विभाग पार पिछाडीवर पडला आहे. समाज कल्याण विभागाच्या दलितवस्तीच्या कामावरच अधिकाऱ्यांपासून ते पदाधिकाऱ्यांचा डोळा ताणलेला असतो. त्यातून आर्थिक मलिदा अधिक असल्याने निधीच्या पळवा-पळवी ते परस्पर नियोजनाच्या मुद्दावर कामकाज गाजते. मात्र, गरिबांच्या हिताच्या प्रश्नांवर पदाधिकारी मूग गिळून गप्प असतात, अशा प्रतिक्रिया लोकांमधून उमटत आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...