रविवार, २९ डिसेंबर, २०१३

फारुख शेख काळाच्या पडद्याआड


आपल्या सहजसुंदर अदाकारीनं, अनोख्या अभिनयशैलीच्या जोरावर बॉलिवूडच्या पडद्यावर छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते फारुख शेख यांचं दुबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. पत्नी आणि दोन मुलींसोबत दुबईला फिरायला गेले असतानाच त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि सिनेरसिकांना हसवणारा, 'जिना इसी का नाम हैं' म्हणत जगायला शिकवणारा हा अभिनेता काही वेळातच काळाच्या निघून पडद्याआड गेला.

सत्तरच्या दशकात रंगभूमीवरून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात करणा-या फारुख शेख यांनी १९७३ मध्ये 'गरम हवा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यात त्यांनी साकारलेला 'सिकंदर मिर्झा' सिनेप्रेमींच्या मनावर ठसला. त्यानंतर, एकापेक्षा एक झक्कास भूमिकांमधून, आपल्या अनोख्या स्टाइलनं फारुख शेख यांनी बॉलिवूडमध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. 'बाजार' किंवा 'उमराव जान'सारखी आर्ट फिल्म असो किंवा 'चष्मेबद्दूर'सारखा विनोदी चित्रपट असो, त्यातली आपली व्यक्तिरेखा फारुख शेख यांनी सारख्याच ताकदीनं साकारली. सत्यजित रे यांच्या 'शतरंज के खिलाडी', 'नुरी', 'किसी से ना केहना' या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाला सा-यांनीच दाद दिली. दीप्ती नवल - फारुख शेख जोडी तर बराच काळ हिट चित्रपटासाठीचा फॉर्म्युलाच होऊन गेली होती. नासिरुद्दीन शाह - दीप्ती नवल यांच्या 'कथा' या फारुख शेख यांनी रंगवलेला व्हिलनही भाव खाऊन गेला होता.

नव्वदच्या दशकांत फारुख शेख काही चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेत पाहायला मिळाले. २००८ मध्ये 'सांस बहु और सेन्सेक्स' आणि २००९ मध्ये 'लाहोर' या चित्रपटातही त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. 'लाहोर' चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सहायक अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. यंदा, 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटात ते रणबीर कपूरचे वडील झाले होते, तर याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'क्लब ६०' मध्येही त्यांनी एक छोटेखानी भूमिका साकारली होती.

टीव्ही पडद्यावरून फारुख शेख रसिकांच्या घराघरात पोहोचले होते. चमत्कार, जी मंत्रीजी, श्रीकांत या मालिकांमधील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. 'जिना इसी का नाम है' या शोमध्ये त्यांनी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना बोलतं केलं होतं. त्यातली त्यांची अँकरिंगची शैली सा-यांनाच भावली होती. त्यांचा हजरजबाबीपणा आणि तितकाच नम्रपणा या शोला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला होता.

फारुख शेख यांनी घेतलेली 'एक्झिट' सिनेसृष्टीला चटका लावून गेली आहे. 'फारुख गेला यावर विश्वासच बसत नाहीए', अशा शब्दांत बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...