पुण्यात १९२१ मध्ये शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी
महाराजांच्या स्मारकाचा पायाभरणी समारंभ ब्रिटिश साम्राज्याचा वारसदार
प्रिन्स ऑफ वेल्स याच्या हस्ते करून शिवाजी महाराजांचा गौरव देशोदेशी
पोहोचवला होता. त्याच पुण्यात शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण देशाच्या
राष्ट्रपतींच्या हस्ते होत आहे.
पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्यावतीने राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. शनिवारी (दि. २८ डिसेंबर) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होत आहे. स्मारक म्हणून पुतळ्यांची संकल्पना बदलत चालली आहे. तरीही बदलत्या काळात संबंधित युगपुरुषांचे कार्य लोकांसमोर राहण्यासाठी अशा स्मारकांची निश्चितच गरज असतेच. त्यादृष्टीने पुण्यातील शाहूंच्या पुतळ्याला विशेष महत्त्व आहे.
कोल्हापूरसारख्या छोट्या संस्थानचे राजे असलेले राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याची दखल आता देशभर घेतली जाऊ लागली आहे. शंभर वर्षांपूर्वी त्यांनी राबवलेले उपक्रम आजच्या राज्यकर्त्यांनाही अनुकरणीय ठरत आहेत, त्यातच त्यांचे महत्त्व समजून येते. ब्रिटिशांचे मांडलिक राजे असले तरीही आपल्या अधिकारक्षेत्रात त्यांनी जी सुधारणावादी धोरणे राबवली, ती कुठल्या स्वतंत्र राजवटीतही राबवल्याचे आढळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्यानंतरचा खराखुरा लोकराजा म्हणून त्यांची ओळख अधोरेखित झाली, ती त्यामुळेच. वीसेक वर्षांपूर्वी शाहूंचे कार्य कोल्हापूरपुरतेच मर्यादित होते. शाहू राज्यारोहण शताब्दीनंतर म्हणजे १९९४ नंतर त्यांच्या कार्याचा एकेक पैलू पुढे येऊ लागला. कृ. गो. सूर्यवंशी, पी. बी. साळुंखे, प्रा. डॉ. विलास संगवे, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव आदी शाहू अभ्यासकांनी शाहूकार्याचे समकालिनत्व मांडायला सुरुवात केली. पंधरा वर्षांपूर्वी बहुजन समाज पक्षाचे नेते कांशीराम यांनी शाहूंचे कार्य उत्तरप्रदेशात नेले आणि या राजाची धोरणे देशासाठी मार्गदर्शक असल्याचे दाखवून दिले. त्यानंतरच्या काळात माजी आमदार बाबूराव धारवाडे यांच्या पाठपुराव्याने महाराष्ट्राच्या विधानभवनासमोर राजर्षी शाहूंचा पुतळा उभा राहिला. मनोहर जोशी लोकसभेचे सभापती असताना त्यांनी पुढाकार घेतला आणि लोकसभेच्या आवारातही शाहूंचा पुतळा उभा राहिला. राज्याच्या आणि देशाच्या राजधानीत शाहूंचे पुतळे झाले असले तरी पुण्यातील पुतळाही अनेक अर्थांनी आशयपूर्ण आहे. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीने उभारलेला पूर्णाकृती पुतळा उभारण्यामागील भूमिका पाहिली, तर त्याचे औचित्य लक्षात येते.
राजर्षी शाहू छत्रपतींनी १९ नोव्हेंबर १९२१ रोजी प्रिन्स ऑफ वेल्सला पुण्यात आणून त्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा पायाभरणी समारंभ घडवून आणला. मराठा सैनिकांनी पहिल्या महायुद्धात लढता लढता जे हौतात्म्य पत्करले त्याचे स्मारक म्हणून शनिवारवाड्यासमोर स्मृतिस्तंभ उभारण्यासाठी प्रिन्स ऑफ वेल्स आले होते. प्रिन्स ऑफ वेल्स येत असल्याची संधी साधून शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची कल्पना पुढे आणली. त्यामागे शाहू महाराजांची दूरदृष्टी होती. महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा पायाभरणी समारंभ ब्रिटिश साम्राज्याचा वारसदार प्रिन्स ऑफ वेल्स याच्या हस्ते होऊन त्याच्या तोंडून शिवाजी महाराजांचा गौरव व्हावा आणि तो देशोदेशी पोहोचावा, अशी शाहू महाराजांची धारणा होती. ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल सोसायटीची स्थापना त्याचवेळी झाली. मराठी मुलांना लष्करी शिक्षण मिळावे, या उद्देशाने ती स्थापन झाली. याच संस्थेत आता शाहूंचा पुतळा उभा राहतोय. शाहू महाराजांनी ब्रिटिश राजवटीकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करून घेतला होता. आजच्या काळात शाहूंच्या कार्याचे अनेक पैलू विविध घटकांसाठी दिशादर्शक आहेत, आणि देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांच्या पुतळ्याचे अनावरण होण्याला विशेष महत्त्व आहे. हे घडवून आणण्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष कोल्हापूरचे विद्यमान श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची दूरदृष्टी दिसून येते. याच समारंभात ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेल्या ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथाच्या’ इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन होणार आहे. ‘राजर्षी शाहू छत्रपती-ए सोशल रिव्होल्युशनरी किंग’ हा ग्रंथ अरूण साधू यांनी अनुवादित केला आहे. राज्यपालांच्या हस्ते तो प्रकाशित करून राष्ट्रपतींना म्हणजेच देशाला अर्पण करण्यात येणार आहे.
शाहूंचा पुतळा पुण्यात होण्याला सामाजिक संदर्भही आहे, तो अर्थातच लोकमान्य टिळक आणि शाहू महाराजांच्या संबंधांचा. आपापल्या ठिकाणी उत्तुंग असलेल्या या दोघांचा संघर्ष वीस वर्षे चालला. दोन्ही बाजूंनी मित्रप्रेमापोटी हा संघर्ष केला गेला. ताईमहाराज प्रकरणी लोकमान्य टिळकांनी आपले परममित्र वासुदेव हरी ऊर्फ बाबा महाराज पंडित यांना दिलेल्या वचनासाठी संघर्ष केला. त्याचवेळी शाहू महाराजांनीही राजगुरू रघुपती पंडित ऊर्फ पंडित महाराज यांच्यासाठी संघर्ष केला. अर्थात, या संपूर्ण प्रकरणाचे मूळ वेदोक्त प्रकरणात होते, हेही तितकेच खरे. लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य संग्रामात देशाचे नेतृत्व करीत होते, आणि त्यामुळे राजर्षी शाहूंच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर होता. त्यांच्यातला संघर्ष होता तो सामाजिक मुद्द्यांचा, तोही वैचारिक पातळीवरचा. टिळकांच्या मृत्यूची वार्ता राजर्षी शाहू महाराजांना कळली त्यावेळी ते जेवणाच्या ताटावर बसले होते. वार्ता ऐकून त्यांना खूप दुःख झाले. पुढ्यातले ताट बाजूला सारून ते उपाशी राहिले. टिळकांच्या मृत्यूनंतर संघर्ष संपला, तरी इतिहासाच्या पानांतून तो अधुनमधून डोके वर काढत राहिला. अनेक सामाजिक प्रश्नांच्या निमित्ताने त्याला उजळणी मिळत राहिली.
संघर्षाचा कालखंड आता भूतकाळ बनला आहे. राजर्षी शाहूंनी जे कार्य केले आहे आणि शंभर वर्षांनंतरही ते काळाशी ते इतके सुसंगत आहे, की आज टिळक असते तरी त्यांनी शाहूंच्या गौरवाचा अग्रलेख लिहिला असता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...