आदर्श टॉवर घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव पाटील-निलंगेकर तसेच मंत्री सुनील तटकरे, राजेश टोपे आणि बेनामी व्यवहारात गुंतलेल्या काही मंडळींविरुद्ध भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी बुधवारी मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांना दिलेल्या पुराव्यांचा अभ्यास करून आठवड्याभरात संबंधितांवर एफआयआर दाखल करणे गरजेचे आहे. तशी मागणी भाजपने केली.
सोमैया यांनी आदर्शबाबतचा कॅग, केंद्र सरकारच्या लोकलेखा समितीचा आणि निवृत्त न्यायमूर्ती पाटील यांच्या समितीचा अहवाल अशी पोलिसांकडे १५०० कागदपत्रे सादर केली. त्यामुळे वरील व्यक्तींविरुद्ध भादंविच्या १२० बी यासह ४२०, ४६५, ४६८, ४७१ कलमाखाली फसवणूक, अफरातफर, भ्रष्ट व्यवहार, बेनामी व्यवहार, मनी लाँडरिंग, फेरा, फेमा, अधिकृत कर्तव्याचे उल्लंघन, विश्वासघात याकरिता गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
सोमैया यांनी पोलिसांच्या असे निदर्शनास आणले की, राज्य सरकारने सीबीआयच्या कार्यकक्षेला कोर्टात आव्हान दिले आहे. तसेच सीबीआयने अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यासाठी राज्यपालांची अनुमती मागितली असता, तीही दिलेली नाही. आता केवळ राज्य पोलिसांनाच आदर्शच्या आरोपींवर कारवाई करण्याचा अधिकार असून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निवाड्यानुसार पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यावर सात दिवसांत पुरावे तपासून एफआयआर नोंदवला पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...