शनिवार, ४ जानेवारी, २०१४

‘गुगल’वरून होणार मतदारनोंदणी



सर्च इंजिनमधील दादा कंपनी असलेल्या गुगल कंपनीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला सहकार्याचा हात दिला असून, मतदारांची ऑनलाइन नोंदणी तसेच इतर तांत्रिक बाबींसाठी या कंपनीच्या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.


येत्या पाच-सहा महिन्यांत लोकसभा निवडणूक होणार असून, तिचा एकंदर व्याप खूपच मोठा असेल. नव्या तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्यासंदर्भातील विविध कामे सुकर करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाचा असेल. मतदारांची ऑनलाइन नोंदणी, नोंदणी केल्यानंतर त्याचा पाठपुरावा, मतदानकेंद्र शोधणे आदी बाबींसाठी गुगलच्या सर्च इंजिनची मदत निवडणूक आयोग घेणार आहे. काही दिवसांपूर्वी गुगल निवडणूक आयोग यांच्यात या संदर्भात अंतिम करार झाला, असे कळते. या करारानुसार जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कामास प्रारंभ होईल. मतदारांची नवी यादी जानेवारीच्या सुमारास निवडणूक आयोग प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मतदारांच्या त्याबाबतच्या तक्रारी, त्यांचा पाठपुरावा या कामासाठी गुगलचे सहकार्य घेतले जाणार आहे.

मतदारांची नोंदणी इतर कामांसाठी आम्ही नव्या तंत्रज्ञानाची मदत घेतच असतो. गुगलच्या मदतीने ते काम अधिक सोपे होईल. गुगल सर्चचा, गुगल मॅपचा त्यासाठी उपयोग होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सेवा विनामूल्य

निवडणूक आयोग गुगलला जे सहकार्य करणार आहे, त्यासाठी एरवी सुमारे ५० हजार डॉलर, म्हणजे ३० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम आकारण्यात आली असती. मात्र, गुगल आपली सेवा विनामूल्य उपलब्ध करून देणार आहे. ' कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ' अंतर्गत ही सेवा देण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...