शुक्रवार, १० जानेवारी, २०१४
ग्रामीण भागातील स्नेहलची 'गुगल' भरारी!
अर्धापूर (जि. नांदेड) - कोणत्याही प्रकारच्या खासगी क्लासला न जाता अभ्यासातील सातत्य, कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने थेट आयआयटी कानपूरपर्यंत मजल मारली. तिच्या या जिद्दीची "गुगल' या आंतरराष्ट्रीय संस्थेने पारख केली आणि ती "एम.टेक.'च्या दुसऱ्या वर्षाला असतानाच वार्षिक 24 लाखांचे पॅकेज देऊ केले. विशेष म्हणजे देशातच काम करण्याच्या उद्देशाने स्नेहलने "गुगल'चे वार्षिक 90 लाखांचे पॅकेजही नाकारले.
सुनील रामकृष्ण मोटरवार यांचे सर्वसामान्य कुटुंब. शेती हाच त्यांचा पारंपरिक व्यवसाय. सुनील यांचे वडील शिक्षक. त्यामुळे घरात शैक्षणिक वातावरण. सुनील मोटरवार पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांना मुलगा, मुलगी आहे. मुलगी स्नेहलचे प्राथमिक शिक्षण अर्धापूरच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. वडील सेवेत असल्यामुळे सतत शाळा बदलाव्या लागल्या. तिचे नववी, दहावीचे शिक्षण हदगावच्या स्वामी विवेकानंद शाळेत झाले. दहावीत 87 टक्के गुण मिळाल्यावर तिने विज्ञान विषय घेतला. "जिनियस बॅच'साठी निवड झाली. नांदेडच्या यशवंत महाविद्यालयातून तिने बारावी केली. या परीक्षेत 92 टक्के गुण मिळाले. संगणक अभियंता होण्याच्या ध्येयाने नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालयात प्रवेश घेतला. 2008-09 मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन ती संगणक अभियंता झाली. पदव्युत्तर शिक्षणासाठी तिने कानपूरच्या आयआयटीमध्ये प्रवेश घेतला. त्यासाठीच्या पात्रता परीक्षेत (गेट) ती देश पातळीवर 84 वी आली. दिल्ली, कानपूर, खरगपूर, मद्रास (चेन्नई) या आयआयटीसाठी तिची निवड झाली. तिने कानपूरची निवड केली. सध्या ती या संस्थेत दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.
या संस्थेमध्ये "गुगल'ने डिसेंबरमध्ये कॅम्पस मुलाखती घेतल्या. त्यात पाच जणांची निवड झाली. त्यात स्नेहल मोटरवार एकमेव मुलगी आहे. तिला या कंपनीने परदेशात सेवा केली तर 90 लाखांचे वार्षिक पॅकेजची ऑफर दिली होती. तिने भारतातच सेवा करण्याचे ठरविले. त्यासाठी तिला 24 लाखांचे पॅकेज मिळाले आहे. तिला नियुक्तीपत्र देण्यात आले असून, जूनमध्ये प्रत्यक्ष ती "गुगल'मध्ये कार्यरत होणार आहे. स्नेहलचा भाऊ सुमित नांदेडच्या महात्मा गांधी तंत्रज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटीला कठोर परिश्रमांची जोड दिली तर यश मिळतेच, हे मी अनुभवले. या यशात आई, वडील, शिक्षकांचा मोठा वाटा आहे. पुढे पीएच.डी. करण्याचा मानस आहे.
- स्नेहल मोटरवार
कुटुंबात शैक्षणिक वातावरण होते. मुलीने शिक्षण घ्यावे, स्वावलंबी व्हावे यासाठी प्रयत्न केले. खासगी शिकवणीची कास न धरता तिने मिळविलेले यश कौतुकास्पद वाटते.
- सुनील मोटरवार.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...