ज्येष्ठ सराफ व्यावसायिक आणि पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संस्थापक अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ (वय ९९) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
व्यवसायातील सचोटी, सोन्याच्या शुद्धतेबद्दलचा पारदर्शकता आणि लोकसंग्रह यांमुळे पुणेकरांमध्ये स्वतःचे आगळे स्थान मिळविलेल्या दाजीकाकांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुणे सराफ व्यावसायिकांनी सर्व दुकाने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या मागे मुलगा विद्याधर, नातू सौरभ, सून, नातसून आणि पतवंडे असा परिवार आहे.
हृदयविकार आणि फुफ्फुसातील संसर्गामुळे दाजीकाकांना २ जानेवारी रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी त्याचे पार्थिक दर्शनासाठी लक्ष्मी रस्त्यावरील पीएनजी दालनाच्या समोर ठेवण्यात आले होते. त्या वेळी मोठी गर्दी झाली होती. वैकुंठ स्मशानभूमीत रात्री दाजीकाकांवर अंत्यसंस्कार झाले. या वेळी गाडगीळ कुटुंबातील सदस्यांसह महापौर चंचला कोद्रे, वनमंत्री पतंगराव कदम, माजी महापौर दत्ता गायकवाड, सराफ व्यावसायिक, कर्मचारी आदी उपस्थित होते.
पूर्वी लक्ष्मी रस्ता हा कापड व्यापारासाठी ओळखला जात होता. या रस्त्यावर सराफ व्यवसाय आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ९ फेब्रुवारी १९५८ रोजी दाजीकाकांनी पुण्यात मे. पुरूषोत्तम नारायण गाडगीळ आणि कंपनी नावाने दुकान सुरू केले. आता पुण्यातील सात दालनांसह औरंगाबादमध्ये एक आणि अमेरिकेतही शाखा विस्तार झाला आहे. पुणे सराफ असोसिएशनचा विस्तार आणि त्यास बळकटी देण्याबरोबर ग्राहकांमध्ये सोन्याच्या शुद्धतेबाबत विश्वास निर्माण करण्याचे त्यांनी संस्थेमार्फत केले. सराफ क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दाजीकाकांना २००८ मध्ये बॉम्बे बुलियन असोसिएनशतर्फे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते; तसेच पुणे महापालिकेचा खास नागरी सत्कार, कालनिर्णय पुरस्कार, रोटरी एक्सलन्स अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी दाजीकाकांना गौरविण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...