शुक्रवार, १० जानेवारी, २०१४

पत्रकारांना घडवणारे संपादक प्रभाकरराव रावके



नेहमी प्रमाणे कामात व्यस्त असतांनाच शुक्रवारी दुपारी आमचे संपादक
कृष्णा भाऊंचा फोन आला. त्यांनी दुःखद बातमी सांगितली. रावके साहेब गेले.
आणि मला जुन्या काळातले दिवस आठवू लागले. पांढरा पायजामा, पांढरा शर्ट
घालणारी साधी राहणी व उच्च विचारसरणी जपणारे कॉंग्रेस व पुरोगामी
विचारांना महत्व देणारे प्रभाकरराव रावके यांची छबी माझ्या डोळ्या समोर
उभी राहिली. माझ्या पत्रकारितेची वाटचाल दैनिक सत्यप्रभापासून सुरू झाली.
गोवर्धन घाट रस्त्यावर एका कोपर्‍यात त्यांचा छापखाना होता. विशेष म्हणजे
दैनिक सोबतच जॉबवर्क सुद्धा त्या काळात मोठ्या प्रमाणात चालत असे. तीन
शिफ्टमध्ये हा छापखाना चालत असे. एका शिफ्टमध्ये ८ तासाची ड्युटी असायची
परंतु संपादक रावके साहेब मात्र केंव्हाही आपल्या कामात व्यस्त असलेले
दिसायचे. पत्रकारितेतील ते माझे गुरू. या क्षेत्रातील तंत्र आणि मंत्र
त्यांनी मला शिकवले. मी पत्रकार म्हणून जरी सुरुवात केली असली तरी या
क्षेत्रात व्यवसाय कसा करायचा, जाहिराती कशा मिळवायच्या, लोकांमध्ये कसे
मिसळायचे, माणूस जोडण्याचे काम कसे करायचे हे सारे मी रावके साहेबांकडून
शिकलो, त्यावेळी सत्यप्रभा हे छोटेखानी दैनिक होते. परंतु राजकारणातील
सर्वच लोक सत्यप्रभा आवर्जून वाचत असत. शंकरराव चव्हाण, पद्मश्री शामराव
कदम आदींचा उल्लेख विशेषत्वाने करावा लागेल. सहकार, राजकारण, शिक्षण,
विधायक उपक्रम यांना सत्यप्रभातून प्रसिद्धी मिळत असे, काका साहेब
रसाळांनी सुरू केलेल्या गोदातीर समाचार मध्ये प्रभाकर रावकेंनी दीर्घकाळ
काम केले. नंतर तोच अनुभव पाठीशी घेऊन स्वतंत्र सत्यप्रभा दैनिक सुरू
केले. व्ही.आर. भुसारी, अमृत देशमुख तरोडेकर, एम.के. गुम्मलवार यांची
समर्थ साथ त्यांना मिळाली. नांदेड जिल्हा परिषदेचे मुखपत्र असलेल्या
नंदिग्राम मासिकाचे प्रकाशन सुद्धा सत्यप्रभा छापखान्यातूनच नियमित होत
असे. प्रसिद्धीची हाऊस नाही, अबोल व्यक्तीमत्व म्हणून रावकेंची ओळख
सांगता येईल. मनस्वी जिद्दी माणूस म्हणून त्यांचा परिचय होता. कोणाचीही
पर्वा न करता आपल्याच मस्तीत जगणारा तो माणूस होता. नानासाहेब रावके हे
त्यांचे वडील वयोवृद्ध असणारे नानासाहेब सर्व कर्मचार्‍यांना आजोबाच्या
ठायी होते. पुण्याहुन निघणार्‍या सकाळचे काम सुद्धा प्रभाकर रावकेंनी
त्या काळात केले होते. तत्पूर्वी प्रतिभा साप्ताहिकही त्यांच्या
संपादकत्वाखाली प्रकाशित होत असे नानासाहेब परुळेकरांची शिस्त बातमी
लिखाणाचे वेगळेपण हे आम्हा नवोदित पत्रकारांना रावके साहेब सांगत असत,
त्यांनी कधी किरकीर केलेली मला अजूनही आठवत नाही. एखादी चुक झाली तरी
यापुढे अशी चुक नको असे आम्हाला ते सांगत असत. सत्यप्रभा काही काळाने
प्रकाशन थांबल्यानंतर त्यांनी ओमप्रकाश चालिकवार यांच्याकडे त्याची
सूत्रे दिली. आणि आजतागायत त्याचे प्रकाशन चालू आहे. मुलबाळ व कुणी अपत्य
नाही याचे शल्य प्रभाकररावांना होते. परंतु त्यांनी आपल्या चेहर्‍यावर
कधी भासु दिले नाही. त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन
- नागनाथ देशमुख नांदेड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...