शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

नांदेडमध्ये वर्षभरात ४० शेतक-यांच्या आत्महत्या


नांदेड जिल्ह्यामध्ये या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून, खरीप हंगामामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच अतिवृष्टी झालेल्या भागासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही मदतीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे
प्रमाण वाढू लागले आहे. नांदेड जिल्ह्यात वर्षभरात तब्बल ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, हिमायतनगर तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हिमायतनगर तालुक्यातील धानोरा ज. येथील माधव नारायण कगेवाड (वय ३२) या तरुण शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी आणि चार मुले आहेत. धानोरा या गावात कगेवाड त्यांची तीन एकर शेती आहे. माधवने खरीप हंगामासाठी स्टेट बँकेतून सहा हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी त्याची शेतीतील संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले. या नुकसानीमुळे बँकेचे कर्ज आणि बियाण्याची उधारी कशी फेडायची, या चिंतेने माधवने राहत्या घरीच विष पिऊन आत्महत्या केली.

माधवची परिस्थिती प्रातिनिधीक असून, जिल्ह्यातील अन्य शेतकरीही कमी-अधिक प्रमाणात चिंतेमध्ये आहेत. यावर्षी नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीला तीन वेळा महापूर येऊन गेला. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ४० हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारकडून ठोस मदत मिळालेली नाही. सरकारच्या मदतीची माहिती देताना अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, ' शासनाने पिकांच्या व घराच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. जिल्ह्याला २९ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले. हे अनुदान वाटप झाले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतरच्या मदतीचे आलेल्या प्रस्तावांपैकी १२ जणांना अनुदान देण्यात आले आहे. यातील ११ जणांचे प्रस्ताव चौकशीसाठी प्रलंबित आहेत. तर त्यापैकी १७ जणांचे प्रस्ताव कागदपत्राभावी अपात्र आहेत. '

नापिकी, कर्जामुळे माझ्या पतीने आत्महत्या केली. बँकेच्या कर्जाची त्यांना कायम चिंता होती. शेतात सोयाबीन, कापसाची लागवड केली होती. परंतु अतिवृष्टीमुळे पूर्ण पीक वाहून गेले, चार महिने उलटूनही सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीही मदत केली नाही.

- लताबाई कगेवाड,

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने पॅकेज जाहीर केले होते. मात्र, या तुटपुंज्या मदतीमुळे शेतकऱ्यांना आधार मिळत नाही. परिणामी नापिकी व कर्जबाजारीने हवालदील शेतकरी आत्महत्या करत आहे. अशा घटना रोखण्यामध्ये शासन अपयशी ठरत आहे.

- मणिराम कगेवाड

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा भाऊ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...