मंगळवार, ७ जानेवारी, २०१४

पोलिसांच्या माथी अपयशाचं खापर


गेल्या वर्षभरात नांदेड पोलिस विभागाच्या कामगिरीत गतवर्षीच्या तुलनेत अपयश नोंदवले आहे. 60 खून, 64 बलात्कार, 71 खुनाचा प्रयत्न, दरोडे, जबरी चोरी, घरफोडी, अशा 538 चोऱ्या अशा घटना घडल्या. एकूण वेगवेगळ्या प्रकारचे चार हजार 472 गुन्हे दाखल झालेत.
पोलिस विभागाने सोमवारी (ता. सहा) "पत्रकार दिन' त्याचबरोबर "पोलिस स्थापना दिवस' (रायझिंग डे) निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पोलिस अधीक्षक विठ्ठल जाधव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलिस विभागाचा गेल्या वर्षभराचा आढावा सादर केला. गेल्या वर्षभरात दुखापतीचे 967 गुन्हे दाखल असून त्यापैकी 964 उघडकीस आले. भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूचे 229 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 215 गुन्हे उघडकीस आले आहेत. दंगा, गैरकायद्याची मंडळी जमविल्याबद्दलचे 279 गुन्हे दाखल झालेत. दारूबंदीच्या एक हजार 180 केस दाखल झाल्या. त्यात एक हजार 203 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 17 लाख 56 हजार 168 रुपयांचा माल जप्त केला. जुगार खेळण्याच्या 248 घटना घडल्या असून एक हजार 137 आरोपींना अटक केली. 
 
त्यांच्याकडील 21 लाख 78 हजार 67 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध प्रवासी वाहतूक आणि वाहनांच्या इतर गुन्ह्यांमध्ये वर्षभरात 37 हजार 972 केसेस केल्यात. त्यासाठी 47 लाख 36 हजार दोनशे रुपयांचा दंडही वसूल केला. जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत आत्तापर्यंत एकच गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी गेल्या काही महिन्यांत झालेल्या खुनाच्या घटनेतील आरोपी लवकरच सापडतील, असा विश्‍वास यावेळी पोलिस अधीक्षक जाधव यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर पोलिस निरीक्षक डी. एन. ढोले यांच्यावरदेखील नियमानुसार आणि योग्य वेळी कारवाई केल्याची माहिती त्यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...