शुक्रवार, १० जानेवारी, २०१४

मी सध्या मुंबईमध्येच; काही घडले तर सांगेनच

नांदेड - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठविल्यानंतर आपण मुंबईतच आहोत. दिल्लीसह कुठेही गेलेलो नाही. काही घडले तर सांगूच की, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. 9) बोलताना व्यक्त केली. 

मुंबईतील आदर्श गृहनिर्माण सोसायटी गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापासून श्री. चव्हाण येथे आलेले नाहीत. पाच जानेवारीचाच काय तो अपवाद. या दिवशी ते एका विवाह समारंभासाठी येथे आले व लगेचच मार्गस्थ झाले. या काळात त्यांनी "आदर्श'ची चौकशी करणाऱ्या आयोगाने आपल्यावर अन्याय केल्याची भूमिका घेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर ते दिल्लीला गेल्याची चर्चा रंगली होती. राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत मिळत असतानाच या घडामोडी घडत असल्याने ते पुढील दिशा काय ठरवितात, याकडेही अनेकांचे लक्ष लागले होते. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान, या भागातील कॉंग्रेस पदाधिकारी आणि जनता नेहमीप्रमाणे त्यांच्याच पाठीशी असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या आहेत. 

श्री. चव्हाण म्हणाले, की पाच जानेवारीला नांदेडचा कार्यक्रम आटोपून मी मुंबईला आलो. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले. सध्या मुंबईतच आहे. दिल्लीला किंवा इतरत्र कुठेही गेलो नाही. कुठे गेलो तरी तुम्हा पत्रकारांचे लक्ष असतेच. काही घडले तर मीच तुम्हाला सांगेन. 

आम्ही पाठीशी... आमदार अमर राजूरकर म्हणाले, की अफवा पसरविणे हे विरोधकांचे षड्‌यंत्र आहे. जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम म्हणाले, की माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे कॉंग्रेसचे निष्ठावान पाईक आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्यासोबतच आहोत. कॉंग्रेसच्या माध्यमातूनच त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविले. त्यांची लोकप्रियता आणि राजकीय जडणघडण विरोधकांना पाहवत नाही. पक्षाचे प्रवक्ते संतोष पांडागळे म्हणाले, की अशोक चव्हाण आणि कॉंग्रेस पक्षावर भरभरून प्रेम करणारे आम्ही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आहोत. कॉंग्रेसच सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवू शकते, यावर साहेबांसह आमचाही ठाम विश्‍वास आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...