शुक्रवार, १० जानेवारी, २०१४

दाऊद इब्राहिम लवकरच ताब्यात येईल - शिंदे

 'कुख्यात "अंडरवर्ल्ड डॉन' दाऊद इब्राहिमला भारतात आण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच तो आपल्या ताब्यात असेल,'' असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज येथे केले. 

'दाऊदला भारतात आणण्यात यश येऊ शकते. त्याला पकडण्याबाबत अमेरिकी प्रशासनाशी आम्ही सातत्याने संपर्क ठेवून आहोत. दाऊद कोठे राहतो, याचा पत्ताही "एफबीआय'ला दिला आहे,'' असे श्री. शिंदे यांनी सांगितले. शिंदे नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्या वेळी त्यांनी "एफबीआय'च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्या वेळी मदतीचे आश्‍वासन "एफबीआय'ने शिंदे यांना दिले होते. 

मुंबईतील 1993च्या बॉंबस्फोट मालिकेचा सूत्रधार दाऊद इब्राहिम होता. त्यानंतर "मोस्ट वॉंटेड'च्या यादीत भारताने त्याचा समावेश केला होता. दाऊद पाकिस्तानात असल्याचे वक्तव्य शिंदे यांनी यापूर्वी केले होते. त्यानंतर पाकिस्तानची गुप्तचर संघटना "आयएसआय'ने हा दावा फेटाळला होता. दाऊदचे अल्‌ कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची बाबही पुढे आली होती. त्यानंतर अमेरिकेने त्याचा समावेश जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत केला. 
शिंदे यांनी गेल्या वर्षी 31 जुलै रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर अबू जिंदाल, फसिह मोहंमद, अब्दुल करीम टुंडा, यासीन भटकळ या दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी पकडले आहे. 

सशस्त्र सीमा बलाच्या हन्नुर (ता. अक्कलकोट) येथील बटालियनचा शिलान्यास अनावरण आणि टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील सीमा सुरक्षा दलाच्या बटालियन उभारणीची पायाभरणी शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ""अमेरिकेतील भारतीय वकिलातीतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्या संदर्भात होत असलेल्या कारवाईबाबत आम्ही अमेरिकेच्या संपर्कात आहोत.'' 

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया उभे राहणार असल्याची चर्चा आहे, असे विचारले असता शिंदे म्हणाले, 'भारतात लोकशाही आहे. त्यामुळे कोणी कुठूनही उभे राहू शकतो. कोणी कुठेही उभे राहिले, तरी कॉंग्रेसला त्याचा फरक पडत नाही. माझ्याही मतदारसंघात कुणीही उभे राहिले, तरी मला आतापर्यंत फरक पडलेला नाही, पुढेही पडणार नाही. यूपीए सरकारने अन्नसुरक्षा, हमीभाव यांसारखे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना जरी महायुतीत सहभागी झाली असली, तरी त्याचा परिणाम आघाडीवर होणार नाही.'' सोलापुरातून लोकसभा लढविण्याचेही त्यांनी या वेळी सूचित केले. 

प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चिन्हे आहेत का, असे विचारले असता ते म्हणाले, ""प्रियंका गांधी पूर्वीपासूनच राजकारणात आहेत. 1998-99 मध्ये झालेल्या निवडणुकीत आम्ही एकत्रितपणे अनेक ठिकाणी प्रचार केला आहे. राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असले पाहिजेत व तेच पंतप्रधान व्हावेत.''

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...