शनिवार, ११ जानेवारी, २०१४

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी भास्कर पाटील खतगावकर ?

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून विदर्भ, मराठवाड्यातीलच चेहरा प्रदेशाध्यक्षपदी निवडला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत असलेल्या कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या पदासाठी अनुत्सुक असल्याचे पक्षनेत्यांना कळविले असल्याचे कळते. 

काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या जागी नवा चेहरा देण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी दिल्लीत नुकतीच बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने प्रदेशाध्यक्षपद विदर्भ किंवा मराठवाड्याला मिळाले पाहिजे असा सूर काढण्यात आल्याचे समजते. 
प्रदेशाध्यक्ष पदासाठी पश्चिम महाराष्ट्रातून विखे-पाटील यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, ते या पदासाठी उत्सुक नाहीत. विदर्भातून मुकूल वासनिक व विलास मुत्तेमवार यांच्या नावाची चर्चा आहे तर मराठवाड्यातून रजनी पाटील व भास्कर खातगावकर यांच्या नावाचा विचार केला जात आहे. मुत्तेमवार यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे टीका केली होती. पक्षात आपण सीनिअर असूनही मुख्यमंत्र्यांनी योग्य तो मान दिला जात नसल्याची त्यांची तक्रार होती. 

मुत्तेमवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर शरसंधान केल्याने काँग्रेसमधील एक गट आनंदी झाला असला तरी मुख्यमंत्र्यांच्या गटातून त्यांना विरोध होण्याची शक्यता आहे. रजनी पाटील या पक्षातील सीनिअर नेत्यांपैकी आहेत. तसेच, महिलेला प्रदेशाध्यक्षपद दिल्यास पक्षाची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल असे एका गटाकडून बोलले जात आहे. खातगावकर हे जुनेजाणते नेते आहेत. त्यांच्याबद्दल फारसे वाद नसल्याने त्यांच्या नावाची चर्चा होत आहे. परंतु, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या गटाकडून त्यांना विरोध असल्याचे बोलले जात आहे. प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीतून तूर्त पश्चिम महाराष्ट्राचे नाव मागे पडले असले तरी मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय प्रदेशाध्यक्ष नेमला जाण्याची शक्यता धूसर आहे. खातगावकर वा पाटील यांच्या नावाला मुख्यमंत्र्यांकडून सिग्नल मिळण्याची शक्यता आहे. मुकूल वासनिक यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ घालण्याची खेळीही वरिष्ठ नेत्यांकडून होऊ शकते, असे या सूत्रांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...