शनिवार, ११ जानेवारी, २०१४

भाजप 'आप'ला घेरण्याच्या तयारीत.

narendra modi in maharashtraआम आदमी पार्टीने दिल्लीत काँगेसविरोधात भाजपच्या मतांवर डल्ला मारत सत्ता काबीज केली. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत काँगेसविरोधी मतांचे आप मुळे विभाजन होईल अशी भीती भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे आप च्या विरोधात निवडणूक रणनिती आखण्याचे भाजपने ठरविले आहे.

समाजसेवक अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत जनलोकपालसाठी आंदोलन छेडले तेव्हा भाजपची नेतेमंडळी त्यांना पाठिंबा देत होती. काँगेसविरोधात हे आंदोलन असल्यामुळे भाजपच्या नेत्यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. मात्र , ' आप ने दिल्लीच्या विधानसभेत अनपेक्षित जागा जिंकून भाजपच्या नेत्यांची झोप उडविली. आप निवडणुकीच्या रिंगणात नसते तर भाजपला तेथे स्पष्ट बहुमत मिळाले असते असे भाजपचे नेते आता बोलत आहेत. 

दिल्लीनंतर आप ने महाराष्ट्रासह अन्य राज्यांकडेही लक्ष केंद्रीत केले आहे. सदस्यनोंदणी सुरू केली आहे. त्यामुळे काँगेसच्या विरोधात जाणारा मतदार आप कडे वळला तर भाजपला अडचणीचे ठरू शकते असा अंदाज भाजपच्या नेत्यांनी मांडला आहे. राज्यात राज ठाकरे यांचा मनसे स्वतंत्र लढणार आहेत. त्यातच आप ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष काँगेसविरोधातील मते खेचतील. त्यात भाजपचेच नुकसान होणार आहे. तसेच राज्यातील शहरी भागात शिवसेना-भाजपचे वर्चस्व आहे तेथेच मनसे आणि आप या दोन्ही पक्षांचे प्राबल्य आहे. त्यामुळे शिवसेना भाजप युतीसाठी हे अडचणीचे ठरेल. 

* मोदींची लाट ओसरण्याची भीती 
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सुरुवातीच्या काळात हवा तयार करण्यास भाजप यशस्वी झाला होता. परंतु आप चे सरकार दिल्लीत काँगेसच्या पाठिंब्यावर आल्यानंतर मोदी यांची लाट कमी होत आहे की काय अशी भीती भाजपच्या नेत्यांना वाटू लागले आहे. असेच वातावरण राहिले तर भाजपसाठी ते त्रासदायक ठरेल. त्यामुळे भाजपने आप आणि मनसेविरोधात प्रचार करण्याचे ठरविले आहे. दिल्लीत भाजपने 'आप च्या विरोधात प्रचार सुरू केलेला आहे. त्याचधर्तीवर महाराष्ट्रातही आप च्याविरोधात प्रचार करण्याचे भाजप नेत्यांनी ठरविले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...