गुरुवार, २ जानेवारी, २०१४

कचरा फेकणा-यांवर नांदेडमध्ये कारवाई



खाद्यपदार्थांचा कचरा नाली आणि रस्त्यावर फेकणाऱ्या चार खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून महापालिकेने आठ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. स्वच्छता आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी ही कारवाई केली. महापालिकेने कचरा सार्वजनिक ठिकाणी फेकणाऱ्यांवर ही कारवाई सुरू केली असून, यापुढेही ही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
नरहर कुरुंदकर रस्त्यावरील (भाग्यनगर कमानीजवळ) आईनाथ पाणीपुरी सेंटरच्या चालकाने खरकटे आणि अन्य निरुपयोगी साहित्य जवळच्या नालीत टाकण्यात येत होते. सहाय्यक आयुक्त डॉ. मुंडे यांच्या ही बाब लक्षात आली. त्यावेळी या दुकानदाराकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला.

श्रीनगर भागात हातगाड्यावर मटकी-भेळची विक्री करणाऱ्या आनंदा गायकवाड, विठ्ठल गायकवाड, सुनील अन्नफुले या तिघा विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या तिघा विक्रेत्यांनी त्यांच्या गाड्यांजवळ कचरा टाकण्यासाठी पेटी ठेवली नव्हती. त्यामुळे सर्व कचरा रस्त्यावर जमत होता. डॉ. मुंडे यांनी तिघांनाही प्रत्येकी एक हजार याप्रमाणे तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे शहरातील छोट्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे सांगत, नागरिकांनी घरातील तसेच दुकानदार, हातगाडेचालक किंवा खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आपल्याकडील कचरा एकत्रितपणे जमवून पेटीमध्ये ठेवावा आणि पालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराच्या द्यावा. अॅपेरिक्षा वेळेवर येत नसेल तर त्या भागातील स्वच्छता निरिक्षक किंवा क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...