शनिवार, ४ जानेवारी, २०१४

'आप'मुळे राजकीय स्पर्धा सुरू

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून दिल्लीत आम आदमी पार्टीने काँग्रेस आणि भाजपला नामोहरम केल्यानंतर आता यावरूनच एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यासाठी सध्या भाजप आणि काँग्रेसच्या युवक संघटनांमध्ये
स्पर्धा लागली आहे. बुधवारी भाजपचा भ्रष्टाचारावरील दुटप्पीपणा उघड करण्यासाठी . भा. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानापुढे निदर्शने केली. मंगळवारी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या तुघलक लेन निवासस्थानापाशी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ निदर्शने केली होती. त्याची लगेच परतफेड करण्याचा युवक काँग्रेसने प्रयत्न केला. भ्रष्टाचाराचा आरोप असलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे भाजपमध्ये होऊ घातलेल्या पुनरागमनाच्या निषेधार्थ . भा. युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली राजनाथ सिंह यांच्या अशोक रोडवरील निवासस्थानापुढे निदर्शने करण्यात आली. निदर्शकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात १८ कार्यकर्ते जखमी झाल्याचा दावा करण्यात आला.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजप दुटप्पी वर्तन करीत असून खुद्द पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी गुजरात मंत्रिमंडळातील बाबुभाई बोकरिया आणि पुरुषोत्तम सोळंकी या भ्रष्ट मंत्र्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप राजीव सातव यांनी यावेळी केला. गुजरातच्या विकासाचा मोदी यांच्या दाव्यातील खोटेपणा उघड करण्यासाठी .भा. युवक काँग्रेस गुजरातमध्ये ' विकास शोध ' यात्रा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...