शनिवार, ४ जानेवारी, २०१४

समस्यांची तक्रार करायचीय, नंबर फिरवा



विविध समस्यांनी ग्रासलेल्या नांदेडच्या जनतेला महापालिकेने नवी वर्षाची गिफ्ट दिली असून, समस्या सोडविण्यासाठी २४ तास उपलब्ध असणारे तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

नांदेड महापालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवांच्या तक्रारीसाठी कार्यान्वित केलेले २६२६२६ दूरध्वनी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राची सुरुवात उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या, तर स्थायी समिती सभापती उमेश पवळे यांच्या हस्ते पहिली तक्रार नोंदवून सेवेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, सभागृह नेते . वीरेंद्रसिंघ गाडीवाले, अप्पर आयुक्त रा. . गगराणी, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, राजेंद्र खंदारे, विद्या गायकवाड, नगरसेवक शंकर गाडगे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरतुल्ला बेग, जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, आनंद जाधव उपस्थित होते.

यापुर्वी ही सुविधा घनकचरा ठेकेदारामार्फत केवळ स्वच्छतेच्या तक्रारी नोंदवण्यासाठी सुरू होती. प्रभारी आयुक्त धीरजकुमार यांनी तक्रार निवारण प्रणालीअंतर्गत या सुविधेचा विस्तार करून त्याचे स्थलांतर महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षात करताना ही सुविधा २४ तास सुरू ठेवण्याची सूचना केली होती. त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

महापालिकेच्या www.nwcmc.gov.in या संकेतस्थळावर देखील नागरिकांना तक्रारीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सुविधेमुळे बहुतांश नागरिकांना महापालिका कार्यालयात येता त्यांच्या समस्या घरबसल्या सोडवता येणार आहेत. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेऊन आपल्या तक्रारीचे निराकरण करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

तक्रार नोंदवताच एसएमएस

संकेतस्थळ किंवा दूरध्वनीवर तक्रार करणाऱ्या नागरिकांची ऑनलाइन तक्रार नोंदवल्यानंतर तक्रारीचा नोंदणी क्रमांक आणि पुढील कार्यवाहीच्या टप्प्याची माहिती त्यांच्या तसेच समस्या निवारण करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. त्याचबरोबर तक्रारीच्या नोंदणी क्रमांकाआधारे कार्यवाहीची सध्यस्थिती तपासण्याची सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात
आली आहे.

तक्रार निवारणाचा वेळ निश्चित

नोंदवलेल्या समस्येचे स्वरुप लक्षात घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी संबधित विभागानेच आपली कालमर्यादा निश्चित केली असून प्रलंबित तक्रारींचा दर आठवड्याला प्रशासनाकडून साप्ताहिक आढावा घेतला जाणार आहे. प्रत्येक तक्रारीची सध्यस्थिती मनपा आयुक्त हवे तेव्हा तपासू शकणार आहेत.

प्रभारी आयुक्तांकडून चाचणी

या सुविधेची अंमलबजावणी एक जानेवारीपासून करण्यात आली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त धीरजकुमार यांनी सार्वजनिक तक्रारीची नोंद करून या सेवेची चाचणी घेतली आणि प्रशासनाला सेवेसंबधी काही उपयुक्त सूचना केल्या. बुधवारी सभापती उमेश पवळे यांनी या सेवेचे उद्घाटन करताना आपल्या प्रभागातील सार्वजनिक समस्येची तक्रार 262626 या दूरध्वनीवर केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...