शुक्रवार, १० जानेवारी, २०१४

मालमत्ताधारकांवर सवलतींचा वर्षाव

नांदेड - मालमत्ताकराच्या नोटिसा मिळाल्यानंतर हवालदिल झालेल्या मालमत्ताधारकांना अखेर प्रशासनाने दिलासा दिला आहे. 

मालमत्ताधारकांबरोबरच सत्ताधारी कॉंग्रेससह विरोध पक्ष असलेल्या शिवसेना तसेच राष्ट्रवादी, एमआयएम, संविधान पक्ष, मनसे आदींनी मालमत्ताकरासंदर्भात केलेल्या मागणीचा विचार करून आयुक्तांनी शास्तीबाबत दिलासा देत मालमत्ताधारकांवर सवलतींचा वर्षाव केला आहे. 

गेल्या महिन्याभरापासून मालमत्ता करासंदर्भात नोटिसा मिळाल्यानंतर मालमत्ताधारकांनी लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याचबरोबर बुधवारी (ता. आठ) आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदनही सादर केले होते. 

मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदी विचारात घेऊन शासन व सर्वसाधारण सभेच्या मान्यतेस अधिन राहून हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका हद्दीत एकूण 98 हजार मालमत्ता असून मार्च 2013 पर्यंत मालमत्ता विभागाची करापोटीची थकबाकी 16 कोटी 43 लाख आहे. नवीन रेडीरेकनरनुसार लावण्यात आलेला 2013 - 14 या वर्षाचा मालमत्ता कर जवळपास 43 कोटी आहे. 

31 जानेवारी 2014 पर्यंत 2013-14 या वर्षाचा पूर्ण मालमत्ता कराचा भरणा केला तर थकबाकीवरील शास्तीची रक्कम शंभर टक्के माफ करण्यात येईल. त्याचबरोबर सामान्य करातही दोन टक्के सूट देण्यात येईल. अवैध इमारतीवर मालमत्ता कराच्या दुपटीइतकी अनधिकृत शास्ती लावण्याची तरतूद आहे. 
अकृषिक कराच्या मागणीबाबत आक्षेप असल्यास महापालिकेचा पूर्ण कराचा भरणा करून क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत नांदेड तहसीलदार यांच्याकडे मालमत्ताधारकांनी अर्ज करावा. 

या संदर्भात महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, स्थायी समितीचे सभापती उमेश पवळे, सभागृह नेते वीरेंद्रसिंग गाडीवाले, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, गटनेते डॉ. शीला कदम आणि सय्यद शेर अली तसेच ज्येष्ठ नगरसेवक यांच्याशी देखील चर्चा झाली असल्याची माहिती आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...