निजाम काळापासून सुरू असलेल्या, अनेक वैशिष्ट्यांनी सजलेल्या
माळेगाव (ता. लोहा, जि. नांदेड) येथील खंडोबाच्या यात्रेत चालत असलेल्या
भटक्यांच्या जातपंचायतीला मूठमाती देण्याचा निर्णय प्रमुख पंच दुर्गा
चव्हाण यांनी घेतला आहे. यंदापासून
या यात्रेत जातपंचायत भरणार नाही, असे
जाहीर करण्यात आले. जातपंचायतीचे जाचक निर्णय, समाजातील तरुण-तरुणींनी
पुकारलेले बंड आणि नुकत्याच झालेल्या जादूटोणाविरोधी कायद्याच्या
पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. मंगळवारपासून (ता. 31)
यात्रा सुरू झाली असून, ती पाच दिवस चालते.
मराठवाड्यासह संपूर्ण
राज्यात प्रसिद्ध असलेली ही यात्रा मार्गशीर्ष अमावास्येपासून सुरू होते.
कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान आदी राज्यांतील भाविकही दरवर्षी या
यात्रेला मोठ्या प्रमाणावर येतात. सुईपासून प्रत्येक वस्तू आणि घोडे
बाजारात होणारी कोट्यवधींची उलाढाल हे या यात्रेचे वैशिष्ट्य. या यात्रेत
भटक्यांची जातपंचायत ही भटक्यांसह इतर समाजाचेही आकर्षण राहिली आहे.
यात्रा संपल्यानंतर येथेच मोकळ्या माळरानावर वैदू, गोसावी, घिसाडी,
मसनजोगी, जोशी, कैकाडी, डोंबारी, पारधी, डवरी या भटक्या जमातींची
जातपंचायत भरायची. मढीनंतर (जि. नगर) माळेगावची जातपंचायत सर्वोच्च समजली
जाते. 1935 च्या दरम्यान माळेगाव येथील जातपंचायतीत मुलींच्या खरेदी-विक्री
संदर्भात तत्कालीन वैदू समाजातील गंजीबाई नामक स्त्रीने निजाम पोलिसांत
तक्रार दिली होती. त्यानंतर पंचांना अटक झाली होती. तेव्हापासून माळेगावची
जातपंचायत स्त्रियांच्या बाजूने निकाल देत असे, असाही इतिहास या
जातपंचायतीसंदर्भात सांगितला जातो. भटक्या समाजातही आता शिक्षणाचे प्रमाण
वाढीसह जागृती होत आहे. अनिष्ट प्रथांतून भटक्या समाजाला बाहेर काढून
त्यांचे प्रबोधन करण्यासाठी काही उच्चशिक्षित तरुण अलीकडे माळेगाव यात्रेत
येत होते; परंतु ज्येष्ठांच्या मतापुढे त्यांचे काही चालत नसे. पण, त्यांनी
पाठपुरावा सोडला नाही. समाजातील शिक्षित तरुण आता पुढे येऊन मोठ्या
प्रमाणात प्रबोधन करत आहेत. त्याचा परिणाम जातपंचायतीलाच मूठमाती
देण्याच्या निर्णयात झाले आहे. आता जातपंचायतीऐवजी प्रबोधन मेळावे घेण्याचा
मनोदयही एका तरुणाने व्यक्त केला.
सरकारच्या धोरणाचा आदर करून
यंदापासून माळेगाव यात्रेत जातपंचायत घेतली जाणार नाही. समाजातील भटकेपण
दूर करून आजच्या काळात सर्वांत महत्त्वाचे भांडवल असलेल्या शिक्षणाचा
प्रचार, प्रसार करणार आहोत.
दुर्गा चव्हाण, प्रमुख पंच, जात पंचायत.
विलासरावांच्या स्मृती...
माजी
मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खंडोबा हे कुलदैवत. वडील दगडोजीराव
यांच्याबरोबर विलासराव लहानपणापासून या यात्रेला येत. त्यांच्या
"माधुरी'नामक घोडीचे दरवर्षी यात्रेत आगमन हा उत्सुकतेचा विषय असे. यात्रा न
चुकविण्याचा वसा विलासरावांनी मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री
झाल्यावरही जपला होता. पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी
माळेगावचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करून तब्बल साडेसात कोटींची
कामे केली. त्यामुळे या यात्रेशी विलासरावांच्या स्मृती घट्ट बांधल्या
गेल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...