नवीन नांदेड - आयुष्य संपवायचे या निर्धाराने शंभर फुटांपेक्षाही अधिक उंच असलेल्या गोदावरी नदीवरील वाजेगावच्या पुलावरून एकाने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला. विशेष म्हणजे हा दुसरा-तिसरा कोणी नसून, एस. टी. महामंडळाच्या बिलोली आगाराचा वाहक साईनाथ शंकरराव खंडेराय असल्याचे समोर आले आहे. सोमवारी (ता. सहा) दुपारी ही घटना घडली.
बिलोली आगाराचे वाहक खंडेराय हे दुपारी दोनच्या सुमारास एसटीने प्रवास करत होते. वाजेगाव पुलावर वाहतुकीची कोंडी झाल्याने एसटी थांबली. अशा स्थितीत खंडेराय यांनी एसटीतून उतरून पुलावरून कठड्यावर चढून गोदावरीच्या पात्रात उडी मारली. हा प्रकार एसटीतील प्रवासी व चालकास लक्षात आल्यानंतर आरडाओरड झाली व काही नागरिक व जीवरक्षक मदतीसाठी धावले. अचानकपणे मरणाला जवळ करण्यासाठी गेलेले खंडेराय मात्र उडी मारूनही पाण्यातून वाचले, हे विशेष ! एवढ्या मोठ्या उंचीवरून उडी मारून नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले खरे; परंतु त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. खंडेराय हे बिलोली आगाराचे वाहक आहेत. एसटी अधिकाऱ्यांनी त्यांची एसटी तपासली, या कारणावरून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात आले, मात्र त्याला अद्याप दुजोरा मिळाला नाही. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...