मंगळवार, २४ डिसेंबर, २०१३

संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता अभियान स्‍पर्धेतील जिल्‍हास्‍तरीय तपासणी



नांदेड 24,  संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता स्‍पर्धेच्‍या नियमांचे पालन केल्‍यास गावे समृध्‍द होतील असे मत नाशिक जिल्‍हा परिषदेच्‍या ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रणविर सोमवंशी यांनी केले.
      नांदेड जिल्‍हयातील संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता अभियान स्‍पर्धेतील जिल्‍हास्‍तरीय तपासणी टीमव्‍दारे जिल्‍हयातील गावांची पाहणी ते करत आहेत. देगलूर तालुक्‍यातील ईब्राहीमपूर येथे ग्रामस्‍थांशी संवाद साधतांना सोमवंशी बोलत होते.
      यावेळी गट विकास अधिकारी जी.एल.रामोड, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्‍यवहारे, विस्‍तार अधिकारी बिलोलीचे गर्जे, देगलूरचे बी.एम.कोठेवाड, डी.व्‍ही.सुर्यवंशी, पी.एस.जाधव आदींची उपस्थिती होती.
      राज्‍यातील गावे समृध्‍द व्‍हावीत यांचसाठी राज्‍य शासनाची संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता स्‍पर्धा होत असते. यात काम करणा-या गावांना तालुका, जिल्‍हा, विभाग आणि राज्‍यस्‍तरापर्यंत विविध पुरस्‍कारानं गौरविण्‍यात येते. शिवाय राज्‍यस्‍तरापर्यंत 25 लाखाचे पुरस्‍कार देण्‍यात येतात. एवढया मोठया रक्‍कमेचे बक्षीस कोणत्‍याही योजनेत नाहीत. तरी गावांचा विकास करण्‍यासाठी स्‍वच्‍छता अभियानाची कास ग्रामस्‍थांनी धरल्‍यास प्रत्‍येकाचे आरोग्‍य संपन्‍न राहील असेही सोमवंशी यावेळी म्‍हणाले.
      प्रारंभी ग्रामस्‍थांनी बैलगाडीत बसवून टिमची गावातून मिरवणूक काढून गावक-यांच्‍याहस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. नांदेड जिल्‍हयातील स्‍वच्‍छतेची कामे आणि लोकसहभाग पाहून टिमने ग्रामस्‍थांचे अभिनंदन केले आहे. नांदेड तालुक्‍यातील गुंडेगाव, नायगाव तालुक्‍यातील टाकळी त.ब., देगलूर तालुक्‍यातील ईब्राहीमपूर व लिंगनकेरुर तर मुखेड तालुक्‍यातील पांडूर्णी ही गावे त्‍यांनी पाहिली. जिल्‍हयातील गावांची पाहणी करुन आज दि.25 डिसेंबर रोजी निकाल घोषित करण्‍यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...