' राज्यातील वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी येत्या २६ जानेवारीपासून ' हरित महाराष्ट्र ' अभियान राबविण्यात येणार आहे. आगामी वर्षभरात वन विभागातर्फे सात कोटी रोपे लावण्यात येणार आहेत, ' अशी माहिती वनमंत्री पतंगराव कदम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
नव्याने लागू झालेल्या भूसंपादन कायद्याची नियमावली निश्चित करण्यासाठी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक कदम यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी प्रधान सचिव प्रवीण परदेशी आणि वरिष्ठ वनाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील वनाच्छादन वाढविण्यासाठी राज्यात शंभर कोटी झाडे लावण्याचा प्रकल्प वन विभागाने हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत आत्तापर्यंत वन विभाग, सामाजिक वनीकरण आणि इतर विभागांनी मिळून ३१ कोटी रोपे लावण्यात आली आहेत. गेल्या वर्षी वन विभागाने सहा कोटी रोपे लावली. या उपक्रमात पारदर्शकता ठेवण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी रोपवनांचे संगणकीकृत नकाशे वन विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध केले आहेत. याशिवाय या रोपांची नियमित देखरेख घेण्यात येते आहे. आता या वर्षातील पावसाळ्यात ७ कोटी रोपे लावण्याचे निश्चित झाले आहे. यासाठी येत्या २६ जानेवारीपासून ' हरित महाराष्ट्र अभियान ' राबविण्य़ात येणार आहे. वनक्षेत्रात सरपणासाठी होणारी वृक्षतोड टाळण्यासाठी वन क्षेत्राला लागून राहत असलेल्या राज्यातील ३९ हजार ७७५ कुटुंबाना एलपीजी आणि बायोगॅसचे वाटप केले आहे, असे कदम यांनी सांगितले.
येत्या १६ जानेवारीपासून राज्यातील व्याघ्रप्रकल्पांमध्ये व्याघ्र गणना होणार आहे. यासाठी ट्रान्झिट लाइन आणि कॅमेरा ट्रॅपिंग ही पद्धत वापरण्यात येणार आहे. गेल्या म्हणजेच २०१० मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेत सरासरी १६९ वाघांची नोंद झाली होती. पण गेल्या वर्षातील वाघांच्या ' अॅक्टिव्हिटी ' पाहता या गणनेत वाघांची संख्या वाढून २०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे, असा प्रार्थमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...